सोलापूर : गणेश स्थापना उद्या शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी शनिवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4.47 ते दुपारी 1:57 पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनी घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्या करिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तिंची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतरदेखील करता येऊ शकते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
25 ऑगस्ट रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर म्हणजे दुपारी 1:59 नंतर गौरी आवाहन करता येईल, ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने 26 रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दिनांक 27 रोजी गुरुवारी दुपारी 12:37 नंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा नसते. मात्र यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे. त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल.
यावर्षी 1 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. 10 दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन या दिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. गणेशाचे विसर्जन पाण्यात करावे असे असल्याने घरगुती गणपतींचे विसर्जन घरच्या घरी बादलीत करून ते पाणी आणि माती झाडांना घालता येईल. त्यामुळे विसर्जनाचे ठिकाणी होणारी गर्दी टाळता येईल. पुढच्या वर्षी 10 सप्टेंबर 2021 रोजी शुक्रवारी श्रीगणेश चतुर्थी आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते यांनी दिली आहे.