सोलापूर – दहा पिशव्यांच्या कांदा विक्रीपोटी शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक देणाऱ्या सोलापूर बाजार समितीतील आडत व्यापा-याविषयी सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त झाला.
त्यानंतर माध्यमातूनही टीकेची झोड उठल्यानंतर सोलापूर बाजार समितीचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. The farmer was mocked; The market committee woke up and suspended the license of the trader in Solapur
व्यापाऱ्याच्या या कृतीवर ठपका ठेवत बाजार समितीच्या प्रशासनाने संबंधित व्यापाऱ्याचा आडत परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे. बार्शी तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी १७ फेब्रुवारीला सोलापूर बाजार समितीत सूर्या ट्रेडिंग या आडत व्यापाऱ्याकडे दहा पिशव्या कांदा विक्रीस आणला होता. त्यांच्या कांद्याचे वजन ५१२ किलो भरले. त्यात प्रतिकिलो अवघा एक रुपया इतका दर त्यांना मिळाला. त्यानुसार ५१२ रुपयांची पट्टी त्यांना मिळाली.
पण त्यातून पुन्हा हमाली, तोलाई, मोटारभाडे आदी ५०९.५१ पैसे खर्च वजा जाता २ रुपये ४९ पैसे शिल्लक उरले. पण उरलेले हे पैसे शेतकऱ्याला देण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याने चक्क दोन रुपयांचा चेक दिला. त्यावर कडी म्हणजे हा चेक पंधरा दिवसांनी वटेल, अशी तारीख त्यावर टाकून दिली होती.
‘दै.सुराज्य’ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त २४ फेब्रुवारीच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केले. तसेच व्यापाऱ्याच्या या असंवेदनशील कृतीबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला. बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याला खुलासा मागितला. पण संगणकीकृत कामकाजामुळे अशा पद्धतीचा चेक तयार झाला आणि घाईगडबडीत ही चूक झाल्याचे व्यापाऱ्याकडून उत्तर देण्यात आले. पण हा खुलासा समाधानकारक नसल्याने बाजार समितीचे सचिव चंद्रशेखर बिराजदार यांनी संबंधित व्यापाऱ्याचा आडत परवाना दि.२४ पासून १५ दिवसांसाठी निलंबित करण्याची कारवाई केली. शेतकऱ्याला 2.49 पैशाचा चेक देणे व्यापाऱ्याला भोवले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● परवाना कायम स्वरूपी निलंबित करा
शेतकरी आपला शेतीमाल बाजार समितीत विक्री घेऊन येतो. त्यामुळे त्यांच्या जिवावर अनेक जणांना रोजगार उपलब्ध होतो. यामध्ये व्यापारी, हमाल, तोलाईदार त्यांचा उदरनिर्वाह चालतो. २ रूपये ४९ पैशाचा चेक देवून त्यावर ‘कडी’ म्हणजे तो चेक पुढील १५ दिवसाचा वटला जाईल अशी तारीख टाकणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना १५ दिवसासाठी नाही तर कायमस्वरूपी निलंबित केला पाहिजे. अशी कडक भूमिका बाजार समिती प्रशासनाने घेतली पाहिजे. जेणेकरून यापुढे तरी कोणताही व्यापारी शेतकऱ्यांची थट्टा करणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
● मायनस पट्टी देणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई कधी ?
जिल्ह्यातील दाउतपूर येथील शेतकरी बंडू भांगे यांनी १ फेब्रुवारी रोजी ८२५ किलो कांदा बाजार समितीमधील एस.एन जावळे या अडतदाराकडे विक्रीस पाठविला होता. त्यांची पट्टी ८२५ रुपये झाली आणि हमाली, तोलाईसह खर्च ८२६ रूपये ४६ पैसे झाल्याची पट्टी तयार केली व कहरच कहर करीत संबंधित शेतकऱ्यांला मायनस १ रूपयाची पट्टी हातात दिली असून याबाबतीत बाजार समितीचे सभापती व
सचिव यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
अश्या व्यापाऱ्याना चाप लावण्यासाठी यांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्याचा अधिकार हे सभापती यांना असल्याने ते काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.