सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबीचिंचोळी शिवारातील खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर नाव लावून देण्यासाठी तीन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तत्कालीन तलाठ्यास पाच वर्षे सक्तमजुरी व चार हजार दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश रेखा पांढरे यांनी ठोठावली. Talatha was sentenced to five years of hard labor by the court in connection with accepting a bribe of Rs
रामकिसन पंडितराव किन्हाळकर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या लिंबीचिंचोळीच्या तत्कालीन तलाठ्याचे नाव आहे. यातील तक्रारदाराने लिंबीचिंचोळीत खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावर नाव लावून देण्यासाठी तलाठी किन्हाळकर याने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे संपर्क साधला.
पथकाने लाचेचा सापळा लावला होता. त्यामध्ये तलाठी किन्हाळकर यास लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. किन्हाळकर याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी करून किन्हाळकर याच्याविरुध्द विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी न्यायाधीश पांढरे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे अॅड. अल्पना कुलकर्णी तर आरोपीतर्फे अॅड. अश्विनी कुलकर्णी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार सायबण्णा कोळी, बाणेवाले, घुगे, नरोटे यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 गुरसाळे बंधाऱ्यांची दारे चोरीला; गुन्हा दाखल
पंढरपूर – मागील दोन दिवसापासून तालुक्यातील गुरसाळे बंधाऱ्याची दार वाळू चोराने काढल्याबाबत गोंधळ निर्माण झाल्यानंतर अखेर पाटबंधारे विभागाच्या वतीने ग्रामीण पोलीस ठाण्यात बंधाऱ्याच्या 40 लोखंडी प्लेटा चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक श्रीकांत तोडकरी यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तालुक्यातील कौठाळी हद्दीतील गुरसाळे बंधाऱ्याची शनिवार 25 रोजी नेहमीप्रमाणे पाहणी करीत असताना पाणी पातळी कमी झाली असल्याचे निदर्शनास आले.
यामुळे तोडकरी यांनी पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्यांमध्ये लावलेल्या लोखंडी प्लेटा तपासल्या असता 846 पैकी 40 प्लेटा नसल्याचे आढळून आले. या परिसरात त्याची पाहणी केली असता सदर प्लेटा आढळून आल्या नाहीत त्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात 40 लोखंडी प्लेटा चोरीस गेल्या असून 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मागील दोन ते तीन दिवसापासून गुरसाळे बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दोन आठवड्यापूर्वीच सदर बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी भरले असताना देखील वाळू चोरांनी पाणी पातळी कमी व्हावी म्हणून बंधाऱ्याचे दरवाजेच काढल्याचा आरोप होत आहे.
यावरून आरोप प्रत्यारोप होत असल्यामुळे अखेर पाटबंधारे विभागाने चोरीचा गुन्हा दाखल केला. यापूर्वी देखील गुरसाळे तसेच पंढरपूर व तालुक्यातील इतर बंधाऱ्याचे दरवाजे वाळू चोरांनी काढले आहेत. मात्र याबाबत ठोस कारवाई होत नसल्यामुळे वाळू चोरांचे धाडस वाढले आहे.