● जखमीला ३० लाखांची नुकसान भरपाई
सोलापूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाचे ब्लेडने गुप्तांग धडा वेगळे करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कर्नाटकातील तिघांना ३० वर्षापेक्षा कमी नसलेली जन्मठेप आणि १ लाख ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी यांनी मंगळवारी ठोठावली. Thirty years to life for three who cut private parts; Solapur court for the first time the largest sentence in the state for attempted murder तसेच जखमीला प्रत्येकी १० लाख प्रमाणे एकूण ३० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशात नमूद आहे. खुनाच्या प्रयत्नात झालेली ही मोठी शिक्षा राज्यातील पहिली घटना आहे.
कदीरसाब ऊर्फ मुन्ना चांदसाहेब पटेल (वय ३०), हमीद ऊर्फ अमीर नजीर मुल्ला (वय ३०, दोघे रा. तडवळगा ता.इंडी जि. विजयपूर) आणि हुसेनी नबीलाल जेऊरे ऊर्फ तोडुंगे (वय २३ रा. करजगी ता. अक्कलकोट) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना १७ १७ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास कडबगाव अक्कलकोट) येथे घडली होती.
या खटल्यात सरकारतर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पोलीस पाटील, मोबाईल देणारा पादचारी, डॉक्टर आणि पोलिसांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यात सरकारतर्फे ॲड. माधुरी देशपांडे, ॲड. नागनाथ गुंडे, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. हुसेन बागवान, तर आरोपी तर्फे ॲड. रियाज शेख यांनी काम पाहिले.
● फक्त १५ दिवसांत निकाल
या खटल्यातील विशेष बाब म्हणजे आरोपीच्या वतीने हा खटला लवकरात लवकर निकाली काढावा याकरिता हे प्रकरण अन्य न्यायालयातून प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे वर्ग केले होते. दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि २८ फेब्रुवारी २०२३ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. केवळ पंधरा दिवसात न्यायालयाने निकाल दिला, ही विशेष बाब आहे.
● अशी घडली होती घटना
मेहबूब सैपनसाब कलबुर्गी (वय २७ रा. तडवळगा ता. इंडी) हा विजापूर येथे पाहुण्यांच्या घरी गेला होता. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास त्याचे दोघे मित्र पटेल आणि मुल्ला हे दोघे विजापूर येथे त्याच्या घरी गेले होते. मणूर येथे जेवायला जाऊ असे म्हणत त्याला दुचाकीवरून रात्री मणूर येथे धाब्यावर आणले होते. त्या ठिकाणी हुसेन जेऊरे हा देखील आला होता. तिघांनी जेवण केले. त्यानंतर हमीद मुल्ला याने माझ्या मित्राची रिक्षा कडबगाव येथे बंद पडली आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन येऊ, असे त्याला सांगितले.
त्यानंतर चौघे मिळून दुचाकीवरून गुरववाडी रोडवरून कडबगाव (तालुका अक्कलकोट) येथे पोहोचले. त्या ठिकाणी कुठलीच रिक्षा बंद पडलेली नव्हती. त्या ठिकाणी हमीद मुल्ला याने दुचाकीमधील बियरची बाटली काढून बियर प्राशन केली आणि मेहबूबला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिव्या का देतोस ? असे विचारले असता त्याने बियरची बाटली डोक्यात मारली. तेव्हा मेहबूब जखमी झाला. त्यानंतर दोघांनी त्याला काठीने मारहाण करीत खाली पाडले आणि तू आमच्या तू डोक्यात बसला आहे, तुला लय मस्ती आली आहे, तुला सोडत नाही, असे म्हणत त्याला खाली पाडून दोघे छातीवर बसले. हुसेन जेऊरे याने त्याच्या अंगावरील कपडे काढून खिशातील ब्लेडने त्याचे गुप्तांग धडावेगळे करून तेथेच टाकून दिले. त्यानंतर तिघे पसार झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पादचाऱ्याचे प्रसंगावधान
हा प्रकार घडल्यानंतर मेहबूब कलबुर्गी हा रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर तिथेच पडला होता. पहाटेच्या सुमारास जाग आली. त्यावेळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमांकडून त्याने मोबाईलवरून कडबगाव येथील मेहुणा रियाज दलाई यांना फोनवरून घटना सांगितली.
दरम्यान पादचाऱ्याने याची माहिती कडबगावच्या पोलीस पाटलांना कळवली. त्यानंतर पोलीस पाटलांनी घटनास्थळी घेऊन रस्त्यावर पडलेले गुप्तांग ताब्यात घेऊन जखमीला अक्कलकोट येथील रुग्णालयात पाठवून दिले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची फिर्याद जखमीने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघा आरोपींना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड यांनी या प्रकरणाच्या तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
● दुर्मिळातील दुर्मीळ घटना
ही घटना दुर्मिळातील दुर्मीळ असून ती अतिशय निर्घृणपणे करण्यात आली. गुप्तांग कापल्यामुळे फिर्यादीच्या जीवनातील अपरिमित असे नुकसान झाले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीतून फिर्यादी हा जीवनात केव्हाही सामान्य माणसाप्रमाणे विवाहनंतरचे सुखी जीवन उपभोग करू शकणार नाही. जखमीचे जास्तीत जास्त नुकसान झाले. त्यामुळे आरोपींना शिक्षा जास्तीत जास्त देण्यात यावी, तसेच नुकसान भरपाई देण्यात यावी, असा मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.