■ मानवनिर्मित प्रदूषण अन् वरदायिनी जलाशयाचे ‘मरण’
सोलापूर / शिवाजी हळणवर
सोलापूर ,पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनीला सध्या प्रदूषणाने ग्रासले आहे. ‘Ujni’ is ‘sick’ of pollution, the water stinks green tawang man-made death Solapur Pune कधी काळी काचे सारखे चमकणाऱ्या पाण्याचा रंग पार बदलून गेला आहे. पिण्यासाठी तर सोडाच पण हे पाणी आता काही दिवसांत शेतीसाठी सुद्धा उपयोगी राहणार नाही, असे मत काही जलप्रदुषणावर अभ्यास करणाऱ्या जलतज्ञांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण हे राज्यातील सर्वाधिक पाण्याचा साठा असणारे धरण आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे नंदनवन उजनी धरणामुळे झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. तर हेच उजनी धरण शेतकऱ्यांच्या अर्थिक प्रगतीचा कणा बनले आहे. म्हणून उजनीला शेतकऱ्यांसाठी वरदायनी म्हटले जाते.
पुणे जिल्ह्यातील भिमेच्या उगमापासून अनेक नद्या एकत्र येवून भीमा सारखी महाकाय नदीचे रुप उदयाला आले. यातील काही नद्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून येतात. आणि ही दोन्ही शहर देशात उद्योग आणि शहरीकरणात झपाट्याने वाढलेली शहरे म्हणून ओळख आहे. या शहरांचे नागरीकरण जेवढ्या झपाट्याने झाले तेवढ्याचे झपाट्याने उद्योगही वाढले. ही सर्व क्रांती होत असताना नद्याचे नाले कधी झाले हे प्रशासनाच्या लक्षात आलेच नाही. किंबहुना त्याकडे लक्षच दिले नाही.उद्योगाचे आणि नागरिकरणातील अशुद्ध पाणी सरळसरळ नदी पात्रात येते शहरातील मलमूत्र पाण्यात मिसळले जात आहे.
आता तर या मलमुत्राचा टनेजचा आकडा वाढला असून दररोज सुमारे दीडशे ते दोनशे मेट्रीक टन मलमुत्र नद्यांच्या माध्यमातून उजनीच्या पाण्यात येत आहे. वास्तविक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरापुरते आता नागरीकरण मर्यादित राहिले नाही. तर ते आता पुण्याच्या चाळीस किलोमीटर परिसरात पसरले आहे. रोजच्या रोज नागरिकरणात होत असलेली वाढ आणि त्यापासून होणारे प्रदूषण चिंता करणारे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ पक्षी प्रेमीसाठी नंदनवन उजनी शाप ठरू शकते
उजनी धरण परिसराची प्राकृतिक व भौगोलिक परिस्थिती पक्षी जिवनास अतिशय अनुकूल असल्यामुळे या ठिकाणी पक्षीवैविध्याची परंपरा लाभली आहे. प्रत्येक वर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी शेकडो प्रकारचे पक्षी स्थलांतर करून उजनी पाणलोट क्षेत्रात येऊन धडकतात. युरोप, उत्तर अमेरिकासह अंटाटिका प्रदेश, रशिया, मंगोलिया, कझाकिस्तान, सायबेरिया येथून हजारो मैल अंतर पार करून बदकांसह विविध करकोचे, रोहित फ्लेमिंगो, नदीसुरम्य, समुद्रपक्षी, तुतुवार, पाणटिळवा, भोरड्या, बगळे आदी परदेशी पक्षी उजनी धरण परिसरात गर्दी करतात.
पट्टकंदब हंस, कदंब हंस, परी बदक, चक्रवाक, बाड्डा बदक व विविध हंस पक्षी, स्थलांतरित करून आलेले हिवाळी पाहुणे पक्षी उष्णतेच्या 40 अंशांच्या पाण्याचा अनुभव घेऊन पावसाळ्याच्या प्रारंभी आपल्या मुळस्थानी मार्गस्थ होतात. उजनी धरणातील पाणी उन्हाळ्यात कमी होत असल्याने कीटक, मासे, मृदुकाय प्राणी,बेडकाची पिल्ले आदी खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने काही पक्षी तर आपल्या वंशवाढीसाठी सुद्धा परदेशातून इकडे वाऱ्या करतात. विपुल पाणी, मुबलक खाद्य, लपण्यासाठी व विश्रांतीसाठी सुरक्षित जागा उजनी परिसरात आहे. विविध जाती, अनेक प्रकारचे पक्षी एकाच ठिकाणी पाहण्याचे एकमेव ठिकाण उजनी धरण असल्याने पक्षी प्रेमी, पक्षी अभ्यासकांनी उजनी धरण नंदनवनच आहे.
उजनीतील पाण्याच्या प्रदूषणाची पातळी एवढी वाढली आहे की, पाणी वास मारते. मच्छिमाराच्या हाता पायाला जखमा होऊ लागल्या आहेत. शेतजमिनीवर तेलाचे तवंग दिसतात तर पाण्यात मलमुत्रापासून तयार झालेल्या गॅसच्या बुडबुड्या दिसतात. उजनीच्या प्रदुषणावर वेळीच उपाय नाही केला तर वरदान ठरलेली उजनी शाप ठरू नये.
■ कायदेमंडळात कायदा करणारेच प्रदूषणास जबाबदार
उजनी धरणातील वाढते पाणी प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. धरणातील पाण्यावर पुण्यासह बारामती व उजनी परिसरातील मातब्बर राज्यकर्त्यांनी अनेक उद्योगधंदे, साखर कारखाने, केमिकलयुक्त कंपन्या व इतर छोटे-मोठे उद्योग आणून बसवले आहेत. संबंधित कंपन्यांमधून निघणारे प्रदूषित पाणी मोठ्या टाकीत साठवून ठेवून, पावसाच्या दिवसात नजीकच्या ओढ्या नाल्यांना सोडून दिले जाते. ते प्रदूषित पाणी नंतर उजनीत मिसळून प्रदूषण वाढले आहे.
विधानसभेत कायदे करणारे लोकप्रतिनिधी व त्यांचे समर्थक यांचेच हे उद्योगधंदे आहेत. त्यामुळे तेच या प्रदुषणास जबाबदार आहेत. पाणी दुषित करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ग्रामपंचायत ते खासदारापर्यंत सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींना जबाबदार धरून येणाऱ्या निवडणूकामध्ये घरी बसवून धरणाच्या पाण्याची काळजी घेणारे स्वच्छ लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. अन्यथा उजनीचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे अनिल पाटील (जलतज्ञ) यांनी सांगितले.