सोलापूर : डोक्यावर कामाचा अतिरिक्त ताण अन् कोरोनाची भीती, अशा द्विधा मन:स्थितीतील महापालिका अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे अर्ज सुपूर्द केले आहेत. मात्र, अकरापैकी दोन अधिका-यांचेच प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.
महापालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. दुसरीकडे अधिकारी व पदाधिकाऱ्यांमधील विसंवादामुळे त्यांच्यातील दरी वाढत आहे. कामाचा अतिरिक्त भारामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्यांना कामाचा ताण सोसावा लागत असल्याचे चित्र आहे. 20 वर्षे सेवा बजावल्यानंतर अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना काळात राज्य सरकारनेच स्वेच्छानिवृत्तीसंबंधी स्वतंत्र आदेश काढले आहेत. सोलापूर महापालिकेतील 11 अधिकाऱ्यांनी 30 वर्षे सेवा केल्यानंतर स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्या अर्जांची पडताळणी सामान्य प्रशासन विभागामार्फत सुरू झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची कोणत्या कामानिमित्त चौकशी सुरु आहे का, त्यांच्याकडे महापालिकेची येणेबाकी आहे का, याची खातरजमा केली जात आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांचे स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे सोपविले जाणार आहेत.