सोलापूर : सोलापूरच्या साखर कारखानदारीत सतत चर्चेत असणाऱ्या करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र रविवारी पार पडलेल्या एका सोहळ्यात दिसून आले. सत्ताधारी बागल गट भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत यातून मिळाले. Bagal of Karmala on BJP’s way, Vijaydada’s testimony gave the signal
माजी मंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या उपस्थितीत स्व. दिगंबर बागल यांच्या जयंती निमित्त झालेल्या एका कार्यक्रमाला भाजप नेत्यांची खास उपस्थिती होती. विशेष म्हणजे आदिनाथ सहकारी तत्वावर सुरू करण्यासाठी मदत केलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत व माजी आमदार नारायण आबा पाटील यांची अनुपस्थिती दिसून आली.
करमाळा येथे ९ मार्चपासून (कै.) दिगंबरराव बागल कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेतील भाजप नेत्यांची नावे आणि त्यांनी कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती पाहता बागल भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा करमाळ्यात रंगली आहे. विशेष म्हणजे एका नेत्याने थेट पक्षात प्रवेश करण्याचे आवतानच बागलांना दिले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर आपण नेमके कोणत्या पक्षाबरोबर आहोत, याचा धांगपत्ता अद्यापपर्यंत बागल गटाने कुणालाही लागू दिला नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतरसुद्धा आपण कोणत्या शिवसेनेबरोबर आहोत, याचाही अंदाज त्यांनी कोणाला येऊ दिला नव्हता. मागील विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढल्यानंतरही झालेला पराभव लक्षात घेऊन बागल गटाने अतिशय सावध पवित्रा घेतला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्राप्त परिस्थितीनुसार बागल गटाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या सर्वांबरोबरच सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मात्र त्यांनी भाजपशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी टेंभुर्णी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. रश्मी बागल यांनीही भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्याची चर्चा होती.
● हात जोडले…
प्रास्ताविक करताना मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे हात जोडून कारखान्यांना मदत करण्याची विनंती केली. बागल गटाच्या कारखान्यासमोरील अडचणी पाहता आणि तालुक्यातील राजकीय परिस्थिती विचारात घेता बागल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जाणकारांमध्ये चर्चा सुरू आहे.
कृषी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेत तानाजी सावंत यांचे कोठेही नाव दिसून आले नाही, त्यामुळे सावंत यांच्या माध्यमातून बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.