हैदराबाद : तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून करुण अंत झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घटनेचे कारण शोधण्यासाठी सीआयडीकडून सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकल्पातील पॉवर हाऊसमध्ये गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी तिथे 19 कर्मचारी होते. मात्र, 9 कर्मचारी आगीमुळे अडकून पडले. एनडीआरएफने बचाव मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, शुक्रवारी दुपारी आधी सहा तर थोड्या वेळानं आणखी तीन जणांचे मृतदेह जवानांना मिळाले. 9 जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
सीआयडीचे अतिरिक्त पोलिस संचालक गोविंद सिंह यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंह यांना लवकरात लवकर याबाबत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सीमा भागात श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पॉवर हाऊसमध्ये गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागली त्यावेळेस 19 कर्मचारी काम करत होते.
बचाव पथकाचे प्रमुख श्रीदास म्हणाले की, घटनेच्या वेळी हे कर्मचारी भूमिगत मजल्यावर होते. त्याखाली आणखी तीन मजले आहेत. खालच्या मजल्यावर टर्बाइन असून दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जनरेटर, वीजेचे पॅनल आहेत. चौथ्या मजल्यावर म्हणजेच तळमजल्यावर सर्व्हिस बे आहे. प्रचंड धुरामुळे आणि आग पसरल्यामुळे हे अभियंते वेगवेगळ्या मजल्यावर अडकले. कितीवेळ मदतकार्य सुरू राहिल, हे आताच सांगणे कठिण असल्याचे ते म्हणाले.
शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज
जलविद्युत प्रकल्पातील पॅनल बोर्डमध्ये शॉटसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रकल्पाच्या परिसरात प्रचंड धूर पसरला होता. हा प्रकल्प कृष्णा नदीवर असून हे धरण आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे विभाजन करते. कामावरील अधिकाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु वीज गेल्याने त्यांना फारसे यश आले नाही.