सोलापूर : सांगोला तालुक्यातील घेरडीच्या शाळेत चक्क प्लॅस्टिकचा तांदूळ आढळल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ उडाली होती. पोषण आहाराच्या नावाखाली कुपोषण करणारा प्लॅस्टिकचा तांदूळ विद्यार्थ्यांच्या पोटात जात आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने त्या तांदळाची कसून तपासणी केली. Solapur. The report of all the three investigation teams is the same, it is not about ‘plastic’; Sangola gherdi is only ‘fortified’ rice
तपासात ‘तो’ प्लॅस्टिकचा तांदूळ नसून फोर्टिफाईडचा तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले असून फोर्टिफाईडच्या तांदळामध्ये पोषक घटक असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उत्तम असल्याचा शेरा प्रशासनाकडून मारण्यात आला आहे. घेरडी (ता. सांगोला) येथील सरपंच सुरेखा यशवंत पुकळे यांनी या भेसळीचा भांडाफोड केला होता.
त्यांना रेशनच्या तांदळामध्ये पहिल्यांदा भेसळीचा हा प्रकार लक्षात आला. तांदळासारखा हुबेहूब दिसणारा प्लॅस्टिकचा तांदूळ मिसळण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्लॅस्टिकच्या तांदळाचे दाणे वेचून काढल्यानंतर मूळ तांदूळ आणि प्लॅस्टिकचा तांदूळ यातील फरक स्पष्टपणे जाणवला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यानंतर त्यांनी गावातील प्राथमिक शाळेतील तांदूळ तपासला; तेव्हा त्यातही प्लॅस्टिकचा तांदूळ मिसळण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर पुरवठा विभाग, अन्न व औषध विभाग आणि शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या तांदळाची
तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासणी करण्यात आली असून तपासाअंती तो प्लॅस्टिकचा नव्हे तर फोर्टिफाईड तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसा अहवालच पुरवठा विभागाला संबंधित यंत्रणेकडून सादर करण्यात आल्याची माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे यांनी ‘सुराज्य’ला दिली.
○ फोर्टिफाईड तांदूळच का ?
विद्यार्थ्यांच्या आहारामधील सूक्ष्म पोषकतत्त्वांची कमतरता भरून काढण्याकरिता फोर्टिफाईड तांदूळ दिला जातो. यामध्ये आयर्न, फॉलिक ॲसिड, आणि व्हिटॅमिन बी१२, झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १, २, ३, ५, ६ या पोषक घटकांचा समावेश करून हा तांदूळ बनवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्त्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे.
● गैरसमज का होतो ?
प्रक्रिया करण्यात आलेल्या फोर्टिफाईड तांदळाचे वजन हे नियमित तांदळापेक्षा कमी असते. त्यामुळे हा तांदूळ पाण्यामध्ये तरंगताना दिसून येतो. पोषण आहार योजनेतील तांदळापैकी काही तांदूळ पिवळसर रंगाचा दिसतो आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास येतात. त्यातून तो तांदूळ प्लॅस्टिकचा असल्याचा गैरसमज होतो.
● किती आहे मिश्रणाचे प्रमाण ?
केंद्र शासनाकडून शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ पासून पोषण आहार योजनेअंतर्गत फोर्टिफाईड तांदळाचा केला जात आहे. पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळामध्ये फोर्टिफाईड तांदूळ व नियमित तांदूळ यांचे प्रमाण १:१०० आहे. म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये फोर्टिफाइड तांदळाचे प्रमाण १ किलोमध्ये १० ग्रॅम या प्रमाणात आहे.
” शालेय पोषण आहारामध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ सापडल्याची तक्रार आली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पथकाने तपासणी केली असता हा तांदूळ शासन निर्णयाप्रमाणे फोर्टिफाईड तांदूळ असल्याचे आढळून आले आहे. यापासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका नाही. तसे प्रमाणपत्र अन्न औषध प्रशासन विभागाने दिले आहे.”
– विवेक साळुंखे
(सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी)