बार्शी : बार्शी- कुर्डूवाडी रस्त्यावर बार्शीपासून काही अंतरावर हॉटेल वैशालीजवळ आयशर ट्रक व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. चंद्रकांत ज्ञानोबा गिराम (रा. गोपेगाव ता.पाथरी जि परभणी ) असे मयताचे नाव आहे. In an accident near Barshi, one person died on the spot, a case was filed against the truck driver, Pandharpur Basawakalyan
चंद्रकांत गिराम हा बार्शीकडून कुर्डूवाडीच्या दिशेने दुचाकीवर (एम एच २० ए पी ८४५६) जात होता तर आयशर ट्रक (एम एच ०४ इ एल ३९९१ ) कुर्डूवाडीकडून बार्शीकडे येत होता. हॉटेल वैशाली जवळ या दोन वाहनांचा अपघात होऊन यात दुचाकीवरील चंद्रकांत गिराम हा जागीच ठार झाला. दुपारी ४.१५ वाजता ही घटना घडली.
ट्रक भरधाव वेगात चालवून दुचाकी वरील चंद्रकांत गिराम याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक उत्तम गोविंद मसलकर (रा शिरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर) याच्यावर बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप बाळासाहेब गुंड (रा होळकर बागेजवळ, शिवाजी नगर बार्शी) याने फिर्याद दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पंढरपुरात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
पंढरपूर : शहरातील महाविद्यालयात शिकत असलेल्या १६ वर्षे १० महिने वयाच्या विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना गुरुवारी घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका महाविद्यालयात विद्यार्थिनीला परीक्षेसाठी तिची बहीण व भाऊ गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घेऊन गेले होते. तिला महाविद्यालयाच्या गेटवर सोडून दोघे घरी परतले. तिचे महाविद्यालय संपल्यानंतर ती नेहमी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरी परत येते, म्हणून त्यांनी तिची वाट पाहिली; परंतु ती घरी परत आलीच नाही.
त्यानंतर त्या मुलीच्या बहिणीने भावाला फोन करून सांगितले. त्यानंतर त्यांनी तिची महाविद्यालयात व शहर परिसरात तसेच तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. तरी ती कोठेही मिळून आली नाही. त्यामुळे तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेली असल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या बहिणीने दिली आहे.
● बसवकल्याण येथे ट्रकने कारला ठोकरले; सोलापुरातील एकाचा मृत्यू तर पाच जखमी
सोलापूर : नातेवाईकांना भेटण्यासाठी कर्नाटकातील तांडूर येथे गेलेल्या सोलापुरातील जोशी कुटुंबीय परतताना काल शनिवारी रात्री बसवकल्याण येथे ट्रकने त्यांच्या कारला ठोकरले. ही घटना पेट्रोल पंपावरून इंधन भरून सोलापूरच्या दिशेने येताना घडली.
पौरोहित्यामध्ये विद्वान असलेले, वेद आणि पुराणाचे ज्ञानी तसेच सोलापूरचे ग्रामजोशी जयवंत उर्फ नाथा जोशी (वय ४०, रा. उत्तर कसबा) या तरुण पुरोहितच्या मृत्यू झाला. यामुळे सोलापूरच्या गावठाण भागावर शोककळा पसरली आहे. तर कारमधील पाच जण जखमी झाले आहेत.
जोशी गल्ली परिसरातील जोशी कुटुंबीय हे नातेवाईकांना भेटण्यासाठी तांडूर येथे गेले होते. तेथून ते येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. यात जयवंत जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाय गाडीतील पाच जण जखमी झाले आहेत. मंगला भास्कर जोशी ( वय ७०, रा. जाेशी गल्ली), श्रीकांत भास्कर जोशी (वय-५६, ), मंगेश भास्कर जोशी (वय-३१), सोनू श्रीकांत जोशी (वय-१४ ) व चालक बाळू डोईजोडे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती किरण जोशी यांनी दिली.
दरम्यान, रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव सोलापुरातील घरी आणण्यात आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. जयवंत (नाथा) जोशी यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.