○ कर आकारणीवर अधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप !
सोलापूर : होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालय मिळकतकर थकबाकीपोटी महापालिकेने सील केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बुधवारी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेत धाव घेतली. अधिकाऱ्यांची भेट घेत कर आकारणीवर आक्षेप घेतला. मात्र शास्तीसह संपूर्ण कर भरावाच लागेल, अशी ठाम भूमिका महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी घेतली आहे.
सोलापूर महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून काल मंगळवारी होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालय 75 लाख 67 हजार 553 रुपयाच्या मिळकत कर थकबाकीपोटी सील करण्यात आले तसेच येथील पाण्याचे 2 नळही बंद करण्याची बेधडक कारवाई केली. त्यानंतर बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी थेट महापालिकेत धाव घेतली. मिळकत कराची आकारणी अधिक केल्याचा आक्षेप घेतला. कराची रक्कम अधिक आहे असे सांगितले. अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले तसेच महापालिकेकडे बीएसएनएलचे सुमारे साडेतीन लाख रुपये बिल थकीत आहे तेही त्यांनी भरावे , असे स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांना विचारले असता कोणत्याही स्थितीत शास्तीसह संपूर्ण कर बीएसएनएल कार्यालयाला भरावा लागेल. कोणतेही सूट मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अगोदर नोटीस दिल्याप्रमाणे बीएसएनएलने आपली कर थकबाकी भरावी. साहजिकच महापालिका बीएसएनएलचे बिल भरणारच आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालयाला ठोकले सील !
○ एकाच दिवशी 1 कोटी 26 लाख रुपये मिळकत कर वसूल !
सोलापूर : महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून मंगळवारी होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालय मिळकत कर थकबाकीपोटी सील करण्यात आले तसेच येथील पाण्याचे 2 नळही बंद करण्यात आले आहेत. तर 58 पेठ येथील 5 गाळे सील करण्यात आले आहेत. आज दिवसभरात एकूण 1 कोटी 26 लाख 3 हजार 309 रुपये कर वसुली करण्यात आली आहे.
सोलापूर महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकाद्वारे मिळकत कर वसुली व जप्ती – सिलची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज मंगळवारी महापालिकेच्या पथकांकडून बेधडक कारवाई करण्यात आली.
होटगी रोडवरील बीएसएनएलचे सहाय्यक अभियंता टेलिको सब डिव्हिजन हे कार्यालय 75 लाख 67 हजार 553 रुपयाच्या थकबाकीपोटी सील करण्यात आले तसेच येथील दोन व एक इंची पाण्याचे नळही बंद करण्यात आले. 58 पेठ येथील इमाम रमजान नदाफ यांच्याकडील 6 लाख 4 हजार 470 रुपये थकबाकी पोटी पाच गाळे सील करण्यात आले आहेत.
दरम्यान, मालमत्ता कर विभाग मुख्य कार्यालय पथकाकडून सोलापूर शहरातील 61 पेठ, सिव्हील लाईन, 58 पेठ येथील सात मिळकतदारांकडे एकूण 5 लाख 95 हजार 119 रुपये असलेल्या थकबाकी पैकी 5 लाख 39 हजार 559 रुपये कर वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेकडून करण्यात येत असलेली जप्ती – सिलची कारवाई टाळण्यासाठी मिळकतदारांनी आपला कर त्वरित भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मालमत्ता कर विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी केले आहे.