सोलापूर : स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन नव्हे तर स्वतःचे पोटच रिकामे ठेवून विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक अर्थात बिनपगारी गुरुजींची टप्पा अनुदानासाठी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गर्दी होत आहे. Solapur Zpit Zpit crowd of unpaid teachers, khaki uniform teachers Zilla Parishad came to stop it. शुक्रवारी शेवटच्या दिवशी तर याच गुरुजींची गर्दी इतकी वाढली की या तुडुंब गर्दीला आवरण्यासाठी शिक्षण विभागात चक्क खाकी वर्दी आली. त्याचवेळी ‘वजन’ ठेवल्याशिवाय कोणाचीच ‘फाईल’ पुढे सरकत नसल्याचा जुनाच नियम सक्तीने लागू केला असल्याची तक्रारही याच गुरुजींनी चक्क पोलिसांसमोरच बोलून दाखवली. मात्र अशी तक्रार करणाऱ्या गुरुजींसह सगळ्यांना पोलीस कार्यालयाबाहेर काढत असल्याचे चित्र शुक्रवारी सायंकाळी दिसून आले.
जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनेक शिक्षक विनाअनुदानित शाळांवर काम करीत आहेत. आज ना उद्या शाळांना अनुदान मिळेल आणि आपला पगार सुरू होईल या आशेवर हे शिक्षक बिनपगारी काम करत आहेत. शाळांना अनुदान मिळावे आणि आपला पगार सुरू व्हावा; यासाठी अशा शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत मोठा लढा उभारला. त्या लढ्याची दखल राज्य शासनाने घेतल्यामुळे अशा अनुदानित शाळा आणि तेथील शिक्षकांना टप्पा अनुदान शासनाने मंजूर केले आहे.
त्याच टप्पा अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी गेल्या चार- पाच दिवसांपासून हे बिनपगारी शिक्षक माध्यमिक शिक्षण विभागात हेलपाटे मारत आहेत. मार्चअखेर हे प्रस्ताव मंजूर करून घेणे आवश्यक असल्यामुळे मार्चच्या शेवटच्या दिवशी अशा शिक्षकांनी शिक्षण विभागात गर्दी केली होती. हीच गर्दी हटवण्यासाठी प्रशासनाने शेवटी पोलिसांना पाचारण केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ वजन ठेवल्यास त्रुटी गायब
गर्दीतील अनेक शिक्षकांनी वजन आणि गतीचा वेगळाच नियम शिक्षण विभागात लागू असल्याचे सांगितले. ज्या फाईलीवर वजन ठेवले जाते; त्या फाईलीतील त्रुटी गायब होतात आणि फाईलीला वेग मिळतो. हा नियम उघडपणे लावला जात आहे; असेही काही शिक्षकांनी सांगितले. मुळातच पगार नाही तर फाईलीवर वजन कसे ठेवायचे ? आणि वजन नाही ठेवल्यास फाईल पुढे कशी सरकेल ? या विवंचनेत हे शिक्षक आहेत.
○ त्रुटींमुळे उडाली त्रेधातिरपीट
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी टप्पा अनुदान देण्यापूर्वी टप्पा अनुदान पात्र शाळांमधील अनेक त्रुटी काढल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित कागदपत्रे जमवता जमवता संस्थाचालक आणि शिक्षकांची अक्षरशः तारांबळ उडत आहे. त्या त्रुटीमुळे तर सर्वांची तारांबळ उडाली. शुक्रवारी शिक्षण विभागात एवढा गोंधळ उडाला की, पोलिसांना बंदोबस्तासाठी यावे लागले. पोलिसांना ही शिक्षक आवरेना असे चित्र होते.
● शिक्षक अक्षरशः रडताहेत
शिक्षण विभागातील कर्मचारी शिक्षकांना कोणत्याही प्रकारे सहकार्याची वागणूक देत नाहीत. प्रत्येकवेळी अपमानास्पद बोलणी ऐकवली जातात. एका फाईलीमधली एकच त्रुटी एकावेळी सांगितली जाते. ती दुरुस्त केल्यानंतर पुन्हा दुसरी त्रुटी दाखवून संबंधित शिक्षकाला परत पाठवले जाते. एकीकडे शाळा सांभाळून दुसरीकडे शिक्षण विभागात हेलपाटे मारून वैतागलेले शिक्षक अक्षरशः रडत असल्याचे चित्र शुक्रवारी पाहण्यास मिळाले.
● शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला ठरवले बोगस
यापूर्वी २० टक्के अनुदानासाठी ज्या शिक्षकांना पूर्वीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पात्र ठरवले होते; तेच शिक्षक आता ४० टक्के अनुदानासाठी प्रस्ताव घेऊन आल्यानंतर त्यांना पूर्वीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश बोगस असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे ते शिक्षक अक्षरश: हादरून गेले आहेत. पूर्वीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश बोगस कसे असू शकतात ? याचा उलगडा न झाल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत.