बारामती : बारामती शहर आणि तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोविड केअर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार टाटा ट्रस्टच्या मदतीने बारामतीत कोविड केअर रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
टाटा ट्रस्टच्या वतीने बुलढाणा येथील १०४ बेडचे रुग्णालय उभारले आहे. सांगली येथे ५० बेडचे काम सुरू आहे. त्या पाठोपाठ बारामती देखील लवकरच टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काम मार्गी लागणार आहे. यामध्ये १०० बेड हे वातानुकुलित अतिदक्षता विभागांतर्गत उपलब्ध होतील.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी याबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार टाटा ट्रस्ट ही सुविधा उभारणार आहे. त्यानुसार प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री पवार यांचे कक्ष अधिकारी हनुमंत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी संबंधित जागेची पाहणी केली. त्यानुसार ९ हजार स्क्वेअर फूट जागेत ही सुविधा दिली जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बारामती वैद्यकीय महाविद्यालयासमोरील, महिला रुग्णालयासमोर असणाऱ्या नर्सिंग स्कूलच्या इमारतीमध्ये नियोजन करण्यात येणार आहे. सध्या ही इमारत वापरात नसल्याने याच ठिकाणी ७५ ऑक्सिजन आणि २५ व्हेंटिलेटर बेडची सुविधा कोरोना बाधित रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. शिवाय सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात १०० ऑक्सिजन आणि १५ बेडला व्हेंटिलेटरची सुविधा येत्या काही दिवसात मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्ण संख्येनंतर देखील बारामतीकरांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
* असे असणार कोविड रुग्णालय
रुग्ण विभाग तपासणी, जनरल केअर, प्रयोग शाळा, स्क्रीनिंग, प्रोसेजर रूममध्ये प्रत्येक बेडला मेडिकेशन ड्राव्हर, ओव्हर बेड टेबल, आयबी स्टॅण्डसह सर्व बेडमेडिकल ऑक्सिजन पाईपने परस्परांशी जोडण्यात येणार आहे. याशिवाय अल्ट्रासॉनिक क्लिनिक्स, रक्त साठवण सुविधा, शुगर लेव्हर मॉनिटर, इन्फ्रारेडथर्मामिटर, स्टीम स्टर लायजर, इसीजी, पल्स ऑक्सिमीटर, मोबाईल एक्सरे,अल्ट्रा सोनोग्राफी मशीन, हिमॅटोलॉजी, अॅनेलायझर, सिलिंज व इन्फुजन पंप,वॉर्ड नर्सिंग स्टेशन आदी सुविधा बारामतीकरांना उपलब्ध होणार आहेत.