○ राष्ट्रवादीत सुरू झालाय ‘सामना’ राऊतांचा अजितदादांवर ‘निशाणा’
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत ट्विट करत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी आमदारांची कोणतीही बैठक बोलावली नाही. असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. That news is fake: Ajit Pawar got angry – Why do you raise a fuss without a reason? Political suicide Sharad Pawar Sanjay Raut target match मी मुंबईतच आहे, उद्या (18 एप्रिल) मंगळवारी विधान भवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित असून नियमीत कामकाज करणार आहे. असे ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा हे आपल्या गटातील १५ आमदारांना सोबत घेवून भाजपाच्या आश्रयाला जाणार असल्याची ‘बंद दाराआड’ ची माहिती आता उजेडात येवू लागल्याने राजकीय क्षेत्रात नवे वादळ उठले आहे. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ‘सामना’मधून या बंडाची चिरफाड केल्याने अजितदादांची चिडचिड वाढली आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तरी हे सरकार तरणार आहे, तेव्हा उगाच माझ्याविषयी चित्र रंगवू नका, अशा शब्दात अजितदादांनी पत्रकारांना फटकारले.
हे कमी म्हणून की काय? शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय गौप्यस्फोट केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुतण्याच्या बंडाला काकांची मूक संमती असून ८ एप्रिलला प्रफुल्ल पटेल, अजितदादा व सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी ठरवून बैठक घेतल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे. तर येत्या १५ दिवसात दोन ठिकाणी राजकीय बॉम्बस्फोट होणार असल्याचे भाकित आंबेडकर यांनी वर्तवल्याने राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी ‘सामना’मधून राष्ट्रवादी फोडण्याचा ‘सिझन २ आल्याचा दावा केल्याने राजकीय पंडित चक्रावून गेले आहेत. दरम्यान भाजपात जाणाऱ्यांची राजकीय आत्महत्या ठरेल, असे शरद पवार व उध्दव ठाकरे यांनी म्हटल्याचा गौप्यस्फोट करून राऊतांनी अजितदादांवर निशाणा साधला आहे.
भाजपकडून आता राष्ट्रवादी फोडण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. याचा भंडाफोड राऊतांनी केला आहे. ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यात झालेल्या चर्चेची माहिती राऊतांनी जगजाहीर करून टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पेचात सापडली आहे. कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. जे आता भाजपबरोबर जातील, ते राजकीय आत्महत्या करतील, असे पवार-ठाकरे यांचे मत पडले, असा दावा राऊतांनी केला आहे. त्यांचा हा दावा म्हणजे एकूणच अजितदादांवर रोख असल्याचे मानले जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ अजितदादांचे गणित….
शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरवल्यानंतरही हे सरकार राहील, असा दावा अजितदादांनी नागपूर येथे बोलताना केला. ते म्हणाले, अपक्ष धरून भाजपाकडे ११५ आमदार आहेत. शिंदेंकडे ४० आमदार आहेत. ही संख्या १५० होते. शिवाय १० अपक्ष आमदार युतीसोबत येतील. म्हणजे ही संख्या १६५ होते. त्यातील १६ आमदार कमी झाले तर त्यांच्याकडे १४९ आमदार उरतात. बहुमतासाठी १४५ आमदारांची गरज आहे. कारण नसताना वावड्या उठवण्याचे काम का सुरू आहे? आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे.
○ अजितदादांची कोंडी, शरदरावांची गोची…..
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील ? १५ आमदारांसह ते भाजपात सामील होतील, असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा, असे नमूद करून राऊत यांनी अजितदादांची कोंडी केली आहे. सिल्व्हर ओकच्या बैठकीतील काही गुपिते उघड करून राऊतांनी शरदरावांचीही गोची करून टाकली आहे.
○ शिरसाट काय म्हणाले…
एका मराठी चॅनेलशी बोलताना आ. शिरसाट म्हणाले, ठाकरेंना बोलावून शरद पवारांनी इशारा दिला असावा. दीड तासांची बैठक चहा, पाणी करून किंवा एक वाक्य बोलून होत नसते. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहत नसून, त्यासाठी ते कुणाबरोबरही युती करण्यात तयार असतात. त्यांचा कल भाजपाकडे आहे. राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील. कारण, याला शरद पवारांची मूक संमती आहे. अजित पवारांना त्यांची कातडी वाचवायची आहे. आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही. भाजपाने काय करावे? हा त्यांचा प्रश्न आहे.
○ आंबेडकरांचे भाकित
वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक भाकित पुण्यात बोलताना केला. ‘येत्या १५ दिवसांत राज्यात दोन ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील, असे ते म्हणाले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामुळे आपण १५ दिवस वाट बघुया. यावेळी त्यांना राज्यातील सरकार पडणार का ? असे विचारले असता, येत्या १५ दिवसांत सर्वांना सर्वकाही समजेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.