○ पथकाने 162 आस्थापनांची केली तपासणी, 75 हजार रुपये दंड व 53 किलो प्लास्टिक जप्त
सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध 162 आस्थापनांची तपासणी करून 10 व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 75 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. एकूण 53.6 किलो प्लास्टिक शुक्रवारी जप्त करण्यात आले, अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली. Punitive action against 10 traders under plastic ban campaign in Solapur municipality
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांनी ही कारवाई केली. सोलापूर शहरात विविध 162 दुकानांची तपासणी करण्यात आली. शहरातील दत्त चौक, नवी पेठ परिसर, विडी घरकुल परिसर, मार्केट यार्ड परिसर, गवळी वस्ती, नीलम नगर परिसर, आसरा परिसर, दमाणी नगर, जुळे सोलापूर, तेलंगी पाछा पेठ, विजापूर वेस, साईबाबा चौक, अशोक चौक आदी परिसरातील 162 दुकानांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये कोहिनूर ट्रेडर्स, राकेश वाधवानी, नागेश नल्ला, हिरालाल बुद्धरम, विशाल मल्लिकार्जुन स्वामी, यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला. तसेच भुमेश कन्ना, चंद्रशेखर मासा, ताहुरा बेकरी, खजाना कटपीस, अमोल सिद्राम कटप यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दहा व्यापाऱ्यांकडून एकूण 75 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण 53.6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
या मोहिमेत आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे, नडीमेटला, केदारनाथ गोटे, तमशेट्टी, इंगळे, नागटिळक, अन्वर शेख, नल्लामंदू आदींनी ही कारवाई केली. बंदी असलेले प्लास्टिक वापरू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सेवासदन संस्थेच्या शताब्दी वर्षाचा सांगता समारंभ उत्साहात
सोलापूर : पुणे सेवासदन शाखा सोलापूरच्या शताब्दी वर्षाचा सांगता समारंभ शुक्रवारी (ता. २०) हुतात्मा स्मृती मंदिरात उत्साहात झाला. यावेळी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका शीला पतकी यांना जीवनगौरव पुरस्काराने तर वनमाला किणीकर यांना शताब्दी विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वनमाला किणीकर यांचा पुरस्कार आश्लेषा देखणे यांनी स्वीकारला.
प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रबोधिनी पुणेचे अध्यक्ष गिरीश बापट होते. यावेळी पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा परांजपे, उपाध्यक्ष नितीन लेले, सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, सोलापूर शाखेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिवा प्रा. वीणा पतकी, संचालक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. राजीव प्रधान, राजेंद्र गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गिरीष बापट म्हणाले, विद्यार्थिनींनी आधुनिकतेची कास धरावी. कुटुंबाला आधार देण्याबरोबरच स्वतःची प्रगती करण्याकडेही लक्ष द्यावे. कौशल्य विकासातून अर्थार्जन आणि ज्ञानार्जन करावे. राहणीमानाच्या गुणवत्तेबरोबरच जीवनाची गुणवत्ता ही सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावेत. सेवासदन संस्था उत्कृष्ट कार्य करत असून या संस्थेकडून विद्यार्थिनींनी स्वावलंबनाचे धडे घ्यावेत, असे आवाहन केले.
पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा परांजपे म्हणाल्या, संस्कार शालेय वयातच रुजतात. सज्ञान, सुजाण आणि चांगले नागरिकत्व तयार करण्याचे काम शाळेत होते. हे कार्य करण्यासाठी सेवासदन संस्था नेहमी तत्पर राहील.
यावेळी विविध गुणदर्शनाचाही कार्यक्रम झाला. नांदीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. रमाबाई रानडे यांचा जीवनपट, यक्षगान आणि त्यानंतर शताब्दी गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
संस्थेच्या सचिवा प्रा. वीणा पतकी यांनी शताब्दी वर्षाचा आढावा सादर केला. संस्थेचे संचालक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा गव्हाणे आणि अश्विनी वाघमोडे यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे यांनी आभार प्रदर्शन केले.