● महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी सिद्धेश्वर कारखान्याला दिली नोटीस
सोलापूर : होटगी रोडवरील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचे बांधकाम अनाधिकृतच आहे. त्यामुळे 45 दिवसात बेकायदेशीर बांधकाम काढून घ्यावे, नाही काढल्यास सोलापूर महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल, त्याचा संपूर्ण खर्च सिद्धेश्वर कारखान्याकडून घेण्यात येईल, अशी नोटीस सिद्धेश्वर साखर कारखान्यास आज गुरुवारी पाठवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिली. Chimney of Shree Siddheshwar Sugar Factory unauthorized, remove chimney within 45 days Municipal Corporation issued notice Solapur
सोलापूर विमानसेवेस अडचण ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले यांनी 4 महिन्यांपूर्वी सुनावणी घेतली होती. सुनावणीनंतर नंतर निकाल राखून ठेवला होता. अखेर महापालिका आयुक्तांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणीचे बांधकाम अनधिकृत ठरवले आहे. सोलापूर विमानसेवेस अडथळा ठरणारी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची 91.10 मीटर उंच असलेल्या चिमणीचे बांधकाम अनधिकृत आहे. हे अनाधिकृत बांधकाम तातडीने काढून घ्यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे.
येत्या 45 दिवसात चिमणीचे बेकादेशीर बांधकाम न काढल्यास महापालिकेच्या वतीने ती चिमणी पाडण्यात येईल व त्याचा संपूर्ण खर्च सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून वसूल करण्यात येईल, असेही आयुक्त शितल तेली -उगले यांनी सांगितले.
दरम्यान, चिमणी काढण्यात यावी यासाठी सोलापूर विकास मंचने नियमितपणे पाठपुरावा केला होता. वेळेवर महापालिका आयुक्तांनी निकाल द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली होती. अखेर आज महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी चिमणी संदर्भात निकाल दिला आहे.
यापूर्वी 2017 मध्ये तत्कालीन प्रभारी आयुक्त राजेंद्र भोसले यांनीही चिमणी पाडण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी चिमणी पाडकामासाठी त्यांनी टेंडर ही काढले होते. चार वेळा टेंडर काढले होते मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने पुन्हा प्रसिद्धीकरण केले असता नाशिक येथील विहान कन्स्ट्रक्शन कंपनीने चिमणीचे पाडकाम करण्याची तयारी दर्शवली आहे. जर साखर कारखान्याने स्वतःहून चिमणी पाडली नाही तर विहान कन्स्ट्रक्शन मार्फतच चिमणी पाडकामाचे टेंडर होईल, असे पालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विहान कन्स्ट्रक्शन च्या वतीने चिमणी पाडकामास तत्कालीन पालिका आयुक्त शिवशंकर यांनी सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी साखर कारखान्याच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. काही शेतक-यांनी टॉवरवर चढून या चिमणी पाडकामास विरोध केला होता. त्यामुळे हे चिमणी पाडकाम त्यावेळेस थांबले होते.
सध्यातरी सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला 45 दिवसाचे अभय महापालिकेच्या वतीने आतापर्यंत दोन वेळा चिमणी पाडकामाचे आदेश दिले आहे. मात्र सिद्धेश्वर कारखान्याने कायद्यातून पळवाटा काढत या आदेशाचे बचाव केल्याचे दिसून आले आहे. पुन्हा आता ही तशाच प्रकारे आदेश दिला आहे. येत्या 45 दिवसात चिमणी पाडकामाचे आदेश दिले असले तरी सिद्धेश्वर साखर कारखाना यापुढे काय भूमिका घेतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काय नोटीस बजावली आहे. अद्याप मला माहिती नाही. या संदर्भात माहिती घेऊन, सविस्तर उत्तर देईन, असे धर्मराज काडादी, (माजी चेअरमन, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना) यांनी सांगितले.
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी 2014 पासून अनधिकृत आहे. 2017 सालीच चिमणी पाडण्याचे आदेश दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर आता टेंडर का काढता. पुन्हा त्यांना गाळप, न्यायालयात जाण्यासाठी अभय मिळेल. टेंडर न काढता थेट चिमणीचे बांधकाम पाडावे. केवळ चिमणीच नाही तर सह विद्युत प्रकल्पही अनधिकृत आहे. या निर्णयावर आम्ही समाधानी नसल्याचे केतन शहा (सोलापूर विकास मंच, सदस्य) यांनी म्हटले.