○ दरोड्याचा गुन्हा; दोघांना अटक
सोलापूर – नाटक बघून रात्री घराकडे परतत असताना मोटार अडवून मारहाण करीत रोकड लुटल्याची घटना सोहळे (ता. मोहोळ) येथे शुक्रवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात कामतीच्या पोलिसांनी स्कॉर्पिओ मोटारीतून आलेल्या ६ जणाविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. त्यांना ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने रविवारी दिला आहे. At Sohale, the car was blocked and beaten and robbed of cash; Kamti police registered a case against six persons
सागर उर्फ महांतेश श्रीशैल हुंडेकरी (वय २४ रा. भवानी पेठ, सोलापूर), राहुल उर्फ श्रीकांत सुरेश गेजगे (वय २८ रा.दमानी नगर, सोलापूर), श्रीनिवास गायकवाड, सुरज राठोड, अवि राठोड आणि विशाल राठोड (सर्व रा. दोड्डी ता.दक्षिण सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी सागर हुंडेकरी आणि राहुल गेजगे या दोघांना पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी घेतली आहे.
सोहळे (ता.मोहोळ) येथील प्रशांत विठ्ठल जगताप (वय ३८) हे शेतकरी शुक्रवारी रात्री सोहळे पासून एक किलोमीटर अंतरावर नाटक बघण्यासाठी गेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास ते आपल्या मुलांसह बोलेरो जीप मधून घराकडे निघाले होते. त्यावेळी स्कार्पिओ मोटारीतून आलेल्या आरोपींनी त्यांची बोलेरो अडवून बेदम मारहाण केली. त्यांच्या खिशातील ४ हजार ७०० रुपये रोख आणि इतर कागदपत्रे असलेली पाकीट लुटून घेतली. त्यावेळी गावातील नागरिकांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दरम्यान प्रशांत जगताप यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी ६ जणाविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.पुढील तपास सहाय्यक निरीक्षक माने करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ सापटणे येथे दिवसा घरात चोरी; रोख रकमेसह सव्वा लाखाचे दागिने गायब
सोलापूर – उघड्या घरात प्रवेश करून चोरट्याने कपाटातील रोख रकमेसह १ लाख २८ हजाराचे दागिने पळविले . ही धाडसी चोरी सापटणे (ता.माढा ) येथे शनिवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास घडली. यासंदर्भात संग्राम बाळासाहेब रंदवे (रा. सापटणे) यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दाखल केली . त्याप्रमाणे पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शनिवारी दुपारी २ ते ५ वाजेच्या सुमारास चोरट्याने संग्राम रंदवे यांच्या घरात प्रवेश केला. आणि कपाटातील ३ हजार रुपये रोख, ३० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इतर चांदीचे साहित्य असा ऐवज चोरून नेला. असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास फौजदार चंदनशिवे करीत आहेत.