○ पाणी पळवणाऱ्या बारामतीकरांना वेसण घालण्याचा ‘डाव’ अखेर यशस्वी
○ सरकारकडून ३१०० कोटी रुपयांचा निधी मंजूर, कामालाही आरंभ
सोलापूर – ‘नीरा देवधर धरणांच्या अपूर्ण कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने सुमारे वीस वर्षांपासून बारामतीने पळविलेले हक्काचे पाणी सोलापूर आणि सातारच्या दुष्काळग्रस्त भागांना देणे शक्य होणार आहे,’ असा दावा माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. Satara – Solapur will get rightful ‘water’ Ranjitsinh Nimbalkar Ajit Pawar
‘कालव्याच्या अपूर्ण कामांसाठी ३१०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पैकी ५०० कोटींच्या निविदा प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहेत. आगामी तीन वर्षांत कालव्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे बारामती, इंदापूरला पळविलेले पाणी पुन्हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, माण, खटाव; तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर या तालुक्यांना पुरविले जाणार आहे,’ असे माढा मतदारसंघाचे खा.रणजितसिंह निंबाळकर यांनी दै.सुराज्य शी बोलताना स्पष्ट केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● नेमके प्रकरण काय ?
‘नीरा देवधर धरणातून पुण्यासह सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांसाठी सुमारे १२.९८ दशलक्ष घनफूट (टीएमसी) एवढे पाणी वापरले जाते. नीरा देवघर धरणाच्या कालव्याचे काम अपूर्ण राहिल्याने धरणातील सात टीएमसी पाणी बारामती, इंदापूरला वळविण्यात आले होते. हे अतिरिक्त पाणी बारामतीतील शेतीसह उद्योगधंद्यांना दिले जाते. सोलापूर,सातारच्या हक्काचे पाणी मागीतली वीस वर्षांपासून बारामतीकर वापरत आहेत. त्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून हक्काचे पाणी मिळविण्यासाठी सोलापूर,सातारा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी संघर्ष सुरू केला. आता कालव्याचे काम पूर्ण होणार असल्याने बारामतीचे पाणी बंद होईल,’ असेही निंबाळकर यांनी बोलताना स्पष्ट केले.
● पुण्याच्या पाण्यासाठी नवा पर्याय?
‘पुण्यावर भविष्यात पाणी कपातीचे संकट येऊ नये, यासाठी नीरा देवधर धरणाच्याजवळ शिवथरघळ येथे अडीच टीएमसी क्षमतेचे नवे धरण बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या धरणाच्या कामासाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार धरणासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. नीरा देवधर धरणातील पाणी कोकणात जात असल्याने ते अडविण्यासाठी कोकण विकास महामंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. या धरणाचे पाणी नीरा देवघर धरणात सोडून ते बारामती, इंदापूरसाठी देता येईल,’ असेही निंबाळकर म्हणाले.
माढा लोकसभा मतदारसंघातील विविध सिंचन प्रकल्पांची सद्यस्थिती आढावा घेण्यासाठी आज सिंचन भवनात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील आमदारांची बैठक झाली. त्यात पाणी वितरणासह इतर गोष्टींचा आढावा घेवून माढा मतदारसंघातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाल्याने येत्या दोन ते अडिच वर्षांमध्ये बारामती आणि इंदापूरला पळविलेले पाणी पुन्हा
सोलापूर जिल्ह्यातील भागांमध्ये वळवण्यात येईल. हक्काचे पाणी सातारा, सोलापूरच्या दुष्काळग्रस्त भागांना देणे शक्य होणार असल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.