● ऐन गर्दीत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा सपाटा
पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यासाठी मुक्ताईनगर – जळगावहून निघालेला संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा तब्बल ६०० कि.मी.चे अंतर कापून आज सोमवारी दुपारी पंढरपूरच्या वेशिवर दाखल झाला. मात्र याठिकाणी वारकऱ्यांवर गरम डांबर पडल्याने वारकरी संतप्त झाले. वारक-यांनी दोषीवर कारवाईची मागणी केली. Hot asphalt flew on the palanquin passengers; Warkari angry, demands action against culprits Pandharpur Ashadhi Yatra Solapur
पालखी पंढरीत दाखल होताच ऐन गर्दीत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा सपाटा प्रसासन व ठेकेदाराकडून सुरू होता. पालख्या आल्यानंतर किमान काहीवेळ थांबणे गरजेचे असतानाही काम तसेच रेटण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान कामगारांकडून रस्त्यावरून टाकण्यात येत असलेले गरम डांबर पालखीतील काही भाविकांच्या अंगावर उडल्याने वारकरी व कामगारांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. त्यामुळं काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.
आषाढी यात्रा सोहळ्यापूर्वी पालख्यांच्या स्वागतासाठी सुरू असलेल्या सोयीसुविधा रस्त्यांची कामे पालख्या येण्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती. काल रविवारी अचानक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला भेट देत पत्राशेड दर्शन रांग, वाखरी पालखी तळ, ६५ एकर पालखी तळ, मंदिर परिसर आदी प्रमुख ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. अनेक ठिकाणी सुरू असलेली कामे कागदोपत्री सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ही कामे काहीही करून मला पालख्या येण्याअगोदर पूर्ण झाली पाहिजेत, अशी तंबी त्यांनी दिल्यानंतर प्रशासनाची धावाधाव सुरू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मात्र पंढरपूर शहरात मानाच्या पालख्या दाखल झाल्यानंतरही अनेक ठिकाणी रस्त्याची, सोयीसुविधांची कामे सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली संत मुक्ताबाईंची पालखी तब्बल ६०० कि.मी.पेक्षा जास्त अंतर कापून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरहून पंढरपूरच्या वेशीवर दाखल झाली. पंढरपूर ६५ एकर पालखी तळाशेजारी असलेल्या तीन रस्ता ते पालखी तळ दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर डांबरीकरणाचे काम सुरू होते. त्याचदरम्यान संत मुक्ताई पालखीचे आगमन झाले. पालखी आगमनानंतर काहीकाळ रस्त्याचे काम थांबवावे, अशी मागणी पालखीतील वारकऱ्यांची होती.
मात्र या रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांकडून भाविक चालत असताना १८० ते २०० तापमानावर गरम केलेले डांबर झाऱ्याद्वारे रस्त्यावर टाकण्याचे काम सुरू होते. हे डांबर उडून पालखीतील काही भाविकांच्या अंगावर गेले. त्यामुळे भाविक, सुपरवायझर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या कामगारांनी पालखीचे चोपदार व वारकऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोपही पालखीतील वारकरी सदाशिव पाटील यांनी केला आहे. या मुजोर प्रशासन व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.
आळंदी मध्ये सरकारने वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, आता पंढरपूरमध्ये गरम डांबर टाकून आमचे स्वागत केले जात आहे. एवढ्या दिवस प्रशासन काय करत होते. आम्ही आल्यावरच रस्त्याचे काम कसे काय सुरु केले. गरम डांबर पडून भाविकांना काय झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची याची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजे. मुजोर कामगारांनी आम्हाला धक्काबुक्की केली त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी सदाशिव पाटील (वारकरी मुक्ताई नगर) यांनी केली.
मुक्ताईच्या पालखीत वारकऱ्यांवर गरम डांबर अंगावर पडल्याच्या विषयाबाबत माहिती घेतो त्यानंतरच प्रतिक्रिया देतो असे बांधकाम विभागाचे अधिकारी निमकर यांनी सुराज्य शी बोलताना सांगितले.