सोलापूर : दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना शासनाकडून गरीब शिधा पत्रिकाधारकांना देण्यात येणारा आनंदाचा शिधा अद्यापही रेशन दुकानांमध्ये उपलब्ध झाला नाही. On the eve of Diwali, the ration of happiness is in the godown; Shadow confusion of distribution, Solapur waiting for shopkeepers मागणी प्रमाणे आलेला शिधा गोदामात पडूनच आहे. दिवाळी तोंडावर आल्याने शिधापत्रिकाधारकांकडून वारंवार रेशन दुकानदारांकडे विचारणा केली जात असल्याने दुकानदार वैतागले आहेत.
मोठा गाजावाजा करत शासनाने दिवाळीसाठी केवळ शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले. २५ ऑक्टोबरपासून हा शिधा वाटप करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार आनंदाचा शिधा गोदामात पोहोचला. मात्र रेशन दुकानदारापर्यंत तो अद्याप गेला नाही. आता शिधा वाटप करायचा कधी असा प्रश्न रेशन दुकानदारांना पडला आहे.
राज्य शासनाने गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात केली आहे. गुढीपाडवा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवातही आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता. आता पुन्हा यंदा दिवाळीला आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर करून त्यात दोन वस्तूही वाढविल्या आहेत. गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी हा शासनाचा हेतू आनंदाचा शिधा देण्यामागे आहे. मात्र प्रशासनातील उर्मठ अधिकारी व ठेकेदारांमुळे आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर शहर जिल्ह्यात अन्नधान्य वितरण अधिकारी आणि जिल्हा पुरवठा पुरवठा अधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे शहरासाठी तब्बल एक लाख १७ हजार १०० तर जिल्ह्यासाठी चार लाख असे एकूण पाच ते साडेपाच लाख किट गोडाऊनमध्ये येऊन दाखल झाले आहेत. मात्र नियोजनाचा बट्ट्याबळ उडाल्यामुळे हे कीट अद्याप दुकानदारांपर्यंत पोहोचले नाहीत. आता दिवाळी तोंडावर आलेली आहे. वितरण व्यवस्था कधी होणार, रेशन दुकानदारांपर्यंत हे किट केव्हा पोहोचणार आणि दुकानदार कधी वाटप करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वास्तविक पाहता दिवाळीच्या तोंडावरच जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांची बदली झाली. त्यामुळे या विभागाला कोणीही वाली नाही. अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा पदभार दिला गेला. मात्र शहर आणि जिल्ह्याची जबाबदारी पार पाडणे गैरसोयीचे आहे. आता दिवाळी काही दिवस असताना पुणे आयुक्त कार्यालयातील एका अधिकार्याकडे सोलापूर जिल्हा पुरवठा विभागाचा कार्यभार सोपविला असल्याचे सांगण्यात आले.
○ संतोष सरडे यांच्याकडे पुरवठा विभागाचा पदभार
जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील तांत्रिक अधिकारी संतोष सरडे यांच्याकडे दिला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी लांडगे यांची काही दिवसापूर्वी बदली झाली आहे. या पदाचा पदभार अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र दिवाळीच्या तोंडावर वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचे शिधाचे नियोजन सुरळीतपणे व्हावे यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा पदभार पुणे विभागीय कार्यालयातील तांत्रिक अधिकारी सरडे यांच्याकडे दिला आहे. सरडे हे गुरुवारी पदभार घेणार आहेत.
○ दिवाळीपूर्वी शिधा उपलब्ध करा
आनंदाचा शिधा गोदामात उपलब्ध झाला आहे. मात्र रेशन दुकानदारापर्यंत तो अद्याप पोहोचला नाही. दुकानदारांना आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा आहे. ग्राहकांकडून वारंवार विचारणा होत आहे. काही ठिकाणी तर रेशन दुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने यात विलंब न करता लवकर दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा.
– सुनील पेंटर, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना