○ खिशात आढळली एक चिठ्ठी
जालना : ज्या वर्गात मुलांना शिकवलं त्याच वर्गात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडली. मठ तांडा येथे 50 वर्षीय शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. Teacher commits suicide by hanging himself in school; The teacher is originally from Solapur, Jalna Ambad
मयत शिक्षक मूळ सोलापूर येथील असल्याची माहिती आहे. जालन्यात अंबड तालुक्यातील मठतांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी (ता. 7) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
केरप्पा दिगंबर घोडके (50 रा. सोलापूर, हल्ली मुक्काम पाचोड) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत, अशी माहिती गोंदी पोलिसांनी दिली. या शिक्षकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. आत्महत्या करताना त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती नोट पोलिसांच्या हाती लागली असून त्यावरून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. केराप्पा घोडके हे शांत स्वभावाचे आणि मुलांच्या आवडीचे शिक्षक असल्याने त्यांच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी तसेच पालकांतूनही दुःख व्यक्त होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली असून या चिठ्ठीमध्ये ‘माझ्या मृत्यू ला कोणालाही जबाबदार धरू नये, बाळा, भैय्या, आरती तुम्हा तिघांना माझ्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक त्रास झाला. त्याबद्दल मला माफ करा. आई तुझे उपकार मी फेडू शकलो नाही मला माफ कर. माझ्या कुटुंबाला त्रास देणाऱ्याला सोडू नका’ असे नमुद केले आहे.
मठतांडा येथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत दोन शिक्षक आहेत. शिक्षक केरप्पा घोडके हे मंगळवारी शाळेत आले होते. दुपारपर्यंत त्यांनी मुलांना शिकविले. मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली. नंतर ते शाळेतील वापरात नसलेल्या खोलीत गेले. तेथे लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब ग्रामस्थांना कळताच त्यांनी याची माहिती गोंदी पोलिसांना दिली. गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोहेकॉ मदन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरविला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्षक केरप्पा दिगंबर घोडके हे मूळ सोलापूर येथील असून, ते हल्ली पाचोड येथे राहत होते.