पुणे : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पुण्यात पोहोचला आहे. पुण्यात मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.Send notice to Manoj Jarang, court directive to police, earnest request of CM मराठा आरक्षणाचा मोर्चा आता पुण्यातील शिवाजी नगर भागात पोहोचला आहे. संचेती चौकात त्यांना मोठा हार घालण्यात आला. एक दोन नव्हे तर तब्बल 10 किलोमीटरपर्यंत मराठा मोर्चाची रांग लांबलेली आहे. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक रस्त्यावर आले आहेत. यामुळे अनेक रस्ते जाम झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मनोज जरांगे पाटील यांना अलर्ट केले आहे. जरांगेंचे आंदोलन सामान्य मराठ्याचे आहे. सरकार यामुळे जेरीस आले आहे, पण जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावे, कारण ते घात करतील, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच मराठा समाज आणि ओबीसींमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आपण तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सध्या जरांगेंची पदयात्रा पुण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटलांनी सरकारचा तीन कलमी प्रस्ताव फेटाळल्याचे वृत्त समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय काल रात्री रांजणगाव गणपती येथे आले होते. अडीच तासांनंतर त्यांना जरांगे यांची वेळ मिळाली. चर्चेदरम्यान राज्य सरकारचा तीन कलमी प्रस्ताव अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवला. परंतु, जरांगे यांनी प्रस्ताव फेटाळला आहे.
मनोज जरांगेंना नोटीस पाठवा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने आज पोलिसांना दिले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. मुंबईतील आझाद मैदानाची क्षमता 5 हजार लोकांची आहे, याची माहिती जरांगेंना द्यावी, रोड ब्लॉक होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे निर्देशही कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. यानंतर जरांगेंना मुंबईत येण्याचा कायदेशीर अधिकार नाही, असे सदावर्ते यांनी म्हटले.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पीटिशनवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. या याचिकेवरील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तिच्यावर आज सायंकाळी 5.30 वाजतापर्यंत निर्णय आला. या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधवांचा समुदाय पुणे शहरात दाखल झाला आहे. पुण्यात मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी असंख्य मराठा बांधव आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मुंबईला चालले आहेत. त्यांना आरक्षण द्यावेच लागेल, आम्ही हक्काचे आरक्षण मागतोय, भीक मागत नाही आहोत, अशा प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिल्या आहेत. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी टीका करताना ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचे काम बच्चू कडू करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी माती कालवण्याचे काम बंद करावे, असे आवाहनही त्यांनी केले. धाराशिव येथील पत्रकार परिषदेत शेंडगेंनी ही टीका केली. ओबीसी गरीब समाज असून बच्चू कडू निवडून येण्यामागे या समाजाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांनी ओबीसी समाजाचे भवितव्य टीकवण्यासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये, अशी विनंती आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. “मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडत नव्हत्या. त्याही सापडू लागल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू आहे. 1 लाखापेक्षा जास्त लोक या मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत. मागास आयोग तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. त्रृटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय घेतला जाईल. टिकणारे आरक्षण दिलं जाईल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेला मराठा समाजाचा मोर्चा पुण्यात दाखल झाला आहे. यावेळी पुण्यातील दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर गर्दीच गर्दी पाहायला मिळाली. या मराठा आरक्षण यात्रेत लाखोंच्या संख्येने मराठा सहभागी झाल्याचे दिसले. पुण्यात सगळीकडे भगव्या झेंड्यांमुळे सगळीकडे भगवे वातावरण दिसत होते. या मोर्चामुळे पुण्यात काही ठिकाणी ट्रॅफिक जॅम पाहायला मिळाली.
मनोज जरांगेंनी पोलिसांची विनंती मान्य केली आहे. त्यांनी मुंबईला निघालेल्या पदयात्रेचा मार्ग बदलला आहे. जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक पुण्यात पोहोचले आहेत. मात्र ते पुणे शहरातून मुंबईकडे गेल्यास मोठी वाहतूक कोंडी होणार होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रस्ता बदलण्याची विनंती केली. त्यावर जरांगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच आम्हाला पुण्यात नाहीतर मुंबईत जायचे आहे, असे जरांगे म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढली. ही पदयात्रा बुधवारी (24 जानेवारी) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होत आहे. त्यानिमित्त उद्या सकाळी सहापासून शहरातील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. 8 वाहतूक विभागातील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
25 जानेवारीला मुंबईतील बाजार समिती बंद
मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते भगव्या वादळासह 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठा निर्णय घेतला आहे. 25 जानेवारी रोजी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी दिली आहे. यावेळी बाजार समितीतील सर्व पाचही बाजारपेठा बंद राहणार आहेत.
○ मनोज जरांगेंचा साकारला मेणाचा पुतळा
मराठा आरक्षणासाठी निर्भीडपणे भूमिका घेणारे मनोज जरांगे- पाटील यांचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे. पुण्यातील एकविरा कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये हा पुतळा उभारण्यात आला आहे. कार्ला येथील अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बाप लेकांनी हा पुतळा साकारला असून हा पुतळा बनवण्यासाठी त्यांना 3 महिन्यांचा कालावधी लागला. या पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे.