○ ‘पंतप्रधानांमध्येही एवढी गर्दी करण्याची ताकद नाही’
मुंबई : नवी मुंबईच्या वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाचा जनसमुदाय उसळला आहे. येथील संपूर्ण परिसर हा भगवामय झाला आहे. Crowd of Marathas erupted in Vashi, due to this reason they are not going to Mumbai today – Manoj Jarange येथे थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे राज्य सरकारचा जीआर वाचून दाखवणार आहेत. त्यानंतर ते आपली पुढील भूमिका ठरवणार आहेत. गर्दी एवढी आहे की लावलेल्या भोंग्यांमुळे लोकांपर्यंत आवाज पोहोचत नाही म्हणून इथे अजून काही साऊंड सिस्टीम लावण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील हे सरकारने दिलेल्या जीआरचे वाचन करत आहेत. यात 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख आहे. जरांगे लवकरच वाशीत सभेला संबोधित करणार आहेत. यावेळी ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासभेआधी वाशीत सीआरपीएफ आणि आरपीफ जवान दाखल झाले आहेत. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
आरक्षणासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाले आहे. पायी पदयात्रा नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाली आहे. यावेळी नवी मुंबईकरांनीही सहकुटुंब आंदोलनात सहभाग घेतला आहे. दोन वर्षांच्या मुलांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आंदोलनात सहभागी होताना दिसले. आंदोलकांना जेवण देण्यापासून सर्व प्रकारची मदत नवी मुंबईकरांकडून केल्या जात आहे.
54 लाख नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. तुम्ही काहीही करा रात्रीपर्यंत सर्व अध्यादेश द्या, असे आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केले आहे. 26 जानेवारीचा मान ठेऊन मुंबईत आज जात नाही, वेशीवरच थांबतो. आजची रात्र येथेच काढतो. पण उद्यापासून जोपर्यंत अध्यादेश मिळत नाही, तोपर्यंत मुंबईतून बाहेर जाणार नाही, तसेच मी उपोषण मागे घेणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुंबईतील आझाद मैदानावर आज जात नाही. आजचा मुक्काम वाशीतच करतो. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश उद्या सकाळी 11 वाजतापर्यंत द्या. त्यानंतर आझाद मैदानावर जाण्याबद्दलचा निर्णय उद्या 12 वाजता घेणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. आरक्षण मिळाले नाही तर आझाद मैदानाकडे जाणार आणि आझाद मैदानाकडे निघालो तर मागे फिरणार नाही, असाही इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
मिळालेल्या नोंदीच्या आधारावर व त्या नोंदधारकाच्या शपथपत्रावर सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे जीआरमध्ये सांगितलेले असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. तसेच सग्यासोयऱ्यांमधून सुटलेल्या मराठ्यांना 100 टक्के मोफत शिक्षण करण्यात यावी अशी माहिती देण्यात यावे व सुप्रीम कोर्टातून क्युरेटिव्ह पीटिशनवर निर्णय होत नाही, तोपर्यंत शासकीय भरती करुन नाही किंवा राखीव जागा ठेवाव्यात.
शासनाच्यावतीने आपल्या मार्गावर चर्चा झाली आहे. 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. ते प्रमाणपत्र वाटप सुरु आहे. त्यानोंदींची ग्रामपंचायतीत व शिबीरातून माहिती देणे सुरु आहे. नोंदी मिळालेल्यांच्या परिवाराला त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. वंशावळ जोडायला काही कालावधी लागते त्याबाबत समिती गठीत केली आहे, असे सचिव भांगेंनी सांगितल्याचे ते म्हणाले.
सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर कुणबी दाखले असणाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. त्यानुसार, राज्य सरकार सग्यासोयऱ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भातला अध्यादेश आजच काढू शकते. या अध्यादेशाचा मसूदा तयार करण्यात आला असून त्याची प्रत थोड्याच वेळात जरांगे यांना सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी मराठा आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ‘सरकारने मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. मीरा भाईंदरपासून मुंबईत दंगल घडवू शकतो का? जरांगे पाटील यांनी सर्वसामान्य माणसाची ताकद दाखवून दिली आहे. मी चॅलेंज करतो की, नरेंद्र मोदींपासून भाजपच्या सर्व नेते राज्यात आले तरी जरांगे पाटलांएवढी गर्दी करण्याची ताकद नाहीये,’ असे जलील म्हणाले.
सरकारच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आलेल्या जीआर संदर्भात मनोज जरांगे- पाटील कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पण जर जरांगेंनी वाशीतून मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पण कायदा सुव्यवस्था टिकावी यासाठी वाशी टोल नाका येथे रॅपिड ऍक्शन फोर्सची टीम तैनात करण्यात आली आहे.