नवी दिल्ली : इंडिया आघाडीपुढे रोज नवी आव्हाने उभी रहात आहेत. मात्र आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने मतभेदांवर मात करत लोकसभेसाठी दिल्ली, हरियाणा, गुजरात, चंदिगढ आणि गोव्यातील जागावाटप निश्चित केले आहे.
नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत आपचे सौरभ भारद्वाज, अतिशी, संदीप पाठक आणि काँगे्रसचे मुकूल वासनिक, दीपक बबरिया, अरविंदसिंह लव्हली यांनी ही माहिती दिली. दिल्लीत आप चार तर काँग्रेस तीन जागांवर लढेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आप दिल्ली दक्षिण, नवी दिल्ली, दिल्ली पश्चिम आणि दिल्ली उत्तर पश्चिम मतदारसंघात आपले उमेदवार उभे करतील. काँग्रेसकडे दिल्ली पूर्व , इशान्य दिल्ली आणि चांदनी चौक मतदारसंघ आले आहे.
हरियाणात काँग्रेस नऊ जागांवर लढेल. तर कुरूक्षेत्र आपच्या वाट्याला आले आहे. तर गुजरातमध्ये आप भावनगर आणि भरुचमध्ये लढेल. काँग्रेस गोव्यातील दोन्ही आणि चंदिगढमध्ये लढेल.
पंजाबमध्ये मात्र दोन्ही पक्षांच्या प्रादेशिक संघटनांनी आघाडी करण्यास विरोध दर्शवल्याने तेथे मैत्रीपूर्ण लढती होतील. आसाममध्ये आपने तीन उमेदवारांची घोषणा यापुर्वीच केल्याने तेथील तिढा अद्याप सुटला नाही.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील जागावाटप जाहीर झाल्याच्या दुसर्या दिवशी आप आणि काँग्रेसमधील जागा वाटप जाहीर करण्यात आले. तेथे काँग्रेस 17 जागा तर समाजवादी पक्ष आणि आघाडीतील अन्य पक्ष 63 जागांवर लढणार आहे.
प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने एकला चलोचा नारा दिला आहे. काँग्रेसने तेथे आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.