मयताची ओळख शाबीत करणे महत्वाचे; जिल्हा न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण मिरजगी खून प्रकरणी पती अन् सासू निर्दोष
सोलापूर
सुरेखा मलकारी निंबाळ (वय 30 रा, मिरजगी, ता अक्कलकोट) हिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती मलकारी लक्ष्मण निंबाळ (वय 35), सासू सरुबाई लक्ष्मण निंबाळ (वय 62 रा- मिरजगी, ता अक्कलकोट, जि सोलापूर) यांच्यावर दाखल खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांचे समोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, संबंधित अशा प्रकरणांमध्ये मयताची ओळख शाबित करण्याचे महत्वाचे असल्याचे निरीक्षण कोर्टाने याप्रकरणी नोंदवले. महत्वाचा निकाल याकेसमध्ये त्यांनी दिला.
यात हकीकत अशी की, दि 16/10/2018 रोजी सुरेखा लोंढे यांच्या उसाच्या शेतामध्ये अनोळखी स्त्री जातीचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आले, त्यावरून मिरजगी येथील पोलीस पाटलाने फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करीत असताना सुरेखा हिने तिचे पती व सासू यांच्याविरुद्ध ते तिस मारहाण व शिवीगाळ करीत असले बाबत तीने 8/10/2018 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यामुळे आरोपी हे तिचे वर चिडून होते व दि.15/10/2018 रोजी आरोपींनी तिस जीवे ठार मारून तिस पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे पोलीस तपासात निष्पन्न झाले, त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.सदर खटल्यात सरकारतर्फे एकंदर सात साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील अॅड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात, मयताचे व मयताच्या मुलाचे डीएनए सॅम्पल घेतले होते. परंतु, डीएनए जुळत असल्याबाबतचे ठोस असे मत आले नसल्याने सदरचे प्रेत हे सुरेखाचेच असल्याबाबत संशय निर्माण होत असल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.यात आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. दत्ता गुंड, अॅड. निशांत लोंढे तर सरकारतर्फे अॅड. दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.
—