चेन्नई, 21 मार्च (हिं.स.)।इंडियन प्रिमिअर लीगमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज संघादरम्यान शनिवारी(दि.२३) चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स संघ आज(दि. २१) चेन्नईमध्ये दाखल झाला. यावेळी मुंबईकरांना पाहाण्यासाठी चेन्नईतील चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली.
मुंबई इंडियन्सची बस खेळाडूंना घेण्यासाठी चेन्नई विमानतळावर तयार होती. तर चेन्नईकर देखील मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी तयार होती.मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी चेन्नई विमानतळा बाहेर चेन्नईकरांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व मुंबईचे इतर खेळाडू व सपोर्ट स्टाफ बसमधून हॉटेलकडे रवाना झाले.
मुंबई इंडियन्सचा चेन्नईविरूद्धचा पहिला सामना सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळवण्यात येणार आहे. मागच्या हंगामात नियमाचे उल्लंघन केल्यामुळे हार्दिक पांडेवर कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार हार्दिकवर एका सामन्याची बंदी आहे. त्यामुळे मुंबईने संघाची जबाबदारी भारताचा ट्वेंटी-२० कर्णधार सूर्यकुमार यादववर सोपवली आहे.
या पहिल्या सामन्यात मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील खेळू शकत नाही. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान झालेल्या पाठीच्या दुखापतीतून पूर्णत: सावरलेला नाही. त्यामुळे बुमराह स्पर्धेतील सुरूवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईच्या संघात दाखल होणार असल्याचे समजत आहे. परंतु त्याच्या पुनरागमनाबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.