डॉ. माने-देशमुखांचा मृत्यू ह्दय विकारानेच;
शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट
: हिप्परग्याच्या घटनेवर आलेले संशयाचे मळभ बाजूला
: जोडभावी पेठ पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
प्रतिनिधी
सोलापूर : हिप्परगा येथील विनायक नगरात वास्तव्यास असलेल्या आणि दवाखानाच्या माध्यमातून रुग्णसेवा देणार्या डॉ. नितीन माने-देशमुख यांचा मृत्यू हा घातपात किंवा आत्महत्यामधून झालेला नसून तो ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या शवविच्छेदान अहवालातून समोर आली आहे. डॉ. देशमुख यांनी गळा चिरुन घेऊन आत्महत्या केली, अशी खळबळजक अफवा याप्रकरणी झाली होती. त्यांचा मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात आला होता. तथापि, शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे खरे कारण समोर आल्याने हिप्परग्यातील घटनेवर आलेले संशयाचे मळभ दूर झाल्याचे जोडभावी पोलीस ठाण्याच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
विशेषत्वे, डॉ. माने-देशमुख यांच्या मृत्यू हा हार्ट ऍट्याकने झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या घटनेबद्दल जो संशय व्यक्त करण्यात आला होता,तो दुर झाला. आत्महत्या की घातपात या अँगलने या घटनेचा तपास करण्याची आपसूकच गरज नसल्याचे जोडभावी पोलीस ठाण्याच्या संबंधितांनी जणू सुटकेचा नि:श्वास सोडला.
हिप्परग्यातील विनायक नगरात डॉ. माने-देशमुख हे वास्तव्याला होते. इमारतीमधील दुसर्या मजल्यावरील बेडरुममध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे गुरुवार (ता.20) सायंकाळी उघड झाले होते. रात्री उशीरा त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शुक्रवार (ता.21) सकाळी दहा वाजता शवविच्छेदन झाले.त्याचा प्राथमिक अहवाल जोडभावी पेठ पोलिसांना प्राप्त झाला आहे. ह्दयाला रक्तपुरवाठा होणार्या रक्त वाहिन्यांमध्ये गाठ निर्माण होवून ह्दयाचा रक्तपुरवठा खंडित झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमुद असल्याचे जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दैनिक ‘सुराज्य’ला सांगितले.
डॉ. माने-देशमुखांच्या मृतदेहावर अंत्यसस्कार
पोस्टमार्टम नंतर डॉ. माने-देशमुखांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात स्मशानभूमीत आणण्यात आला. तिथं त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिप्परग्यात ते त्यांच्या पत्नीसोबत राहात होते. त्यांचा आंतरजातीय विवाह होता. मागील 28 वर्षांपासून ते दोघे एकत राहात असल्याची माहिती समोर आली आहे.
