सोलापूर, 24 मार्च (हिं.स.) : अधिकार नसताना परस्पर बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील चार अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सहा परवानाधारक अभियंतेही कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकाम परवाना प्रकरणातील ९६ पैकी २८ बेकायदा इमारतींचे बांधकाम कोणत्याही नियमात बसत नसल्याने या इमारतींचे पाडकाम करण्याचा प्रस्ताव नगररचना विभाग आणि बांधकाम परवाना विभागाकडून पालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. दरम्यान, संबंधित २८ बेकायदा इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाकडून ऑनलाइन बांधकाम परवाना दिला जातो. परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन बांधकाम परवाने न देता आणि स्वतःकडे असे बांधकाम परवाने देण्याचा कोणताही अधिकार नसताना परस्पर बांधकाम परवाने दिल्याचे गेल्या वर्षी उजेडात आले होते. याप्रकरणी उपअभियंता झाकीर नाईकवाडी व श्रीकांत खानापुरे यांच्यासह चार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यापैकी झाकीर नाईकवाडी व श्रीकांत खानापुरे हे अद्याप अटकेत आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असताना महापालिकेतील निवृत्त अभियंते आणि काही परवानाधारक अधिकाऱ्यांनीही काही बेकायदा बांधकाम परवाने दिल्याचे नगररचना कार्यालयाचे म्हणणे आहे. मात्र, त्याची चौकशी रेंगाळली आहे.