सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यंदा वेगळेच वळण धरत आहे. निवडणुकीचे वळण उत्तर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ मतदार संघ नसून अक्कलकोट विधानसभा मतदार संघाकडे जात आहे. वर्षानुवर्षे दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर व मोहोळमध्येच या निवडणुकीची मोर्चेबांधणी व्हायची पण आता कूस बदलली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीचे नेतृत्व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे दिल्याने इच्छुकांच्या स्वामी समर्थ नगरीकडे वार्या वाढल्या आहेत.
मार्केट कमिटीच्या नाड्या आ.कल्याणशेट्टींकडे देवून भाजप श्रेष्ठींनी दोन देशमुखांना पुन्हा दणका दिल्याचे मानले जात आहे. या समितीवर अनेक वर्षे काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केलेले होते. आमदार विजय देशमुख यांच्या रूपाने काही वर्षे ही समिती भाजपकडे आली आहे.आतापर्यंत या निवडणुकीची रणनिती दक्षिण आणि उत्तर मधीलच नेते ठरवत असत पण महायुतीच्या सरकारने ही मार्केट कमिटी ताब्यात घ्या, असे फर्मान सोडले आहे.त्याची जबाबदारी सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता अक्कलकोटमधून बाजार समितीची रणनिती होत आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपची सत्ता असल्याने इच्छुकांचा ओढा भाजपकडे असल्याचे दिसून येत आहे.
एकेकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापूर बाजार समितीमध्ये वर्चस्व होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. बाजार समिती निवडणूक लागून आठ- दहा दिवस झाले तरी शिंदे कुटुंबियांपैकी कोणीही यात इंटरेस्ट दाखवला नाही. दुसरीकडे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हेही निवडणुकीपासून चार हात लांबच आहेत. सोलापूरची बाजार समिती म्हणजे काँग्रेसच्या राजकारणाला भक्कम करणारी मोठी आर्थिक नाडीच मानली जात होती. गेल्या निवडणुकमध्ये शेतकर्यांच्या मतदानातून भाजपच्या बड्या नेत्यांचा बाजार समितीत प्रवेश झाला आहे.
मिल जुल के चलो; आघाडीतील नेत्यांची भूमिका
बाजार समितीचे विद्यमान राजकारण पाहता भाजपची ताकद फार नाही. समजा या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर काही महिन्यातच बाजार समितीचे रुपांतर राष्ट्रीय बाजारमध्ये होईल अशी भीती उत्तर व दक्षिण मधील नेत्यांना वाटू लागली आहे.मात्र युतीमधून आघाडी झाली तर कदाचित मिल जुल के खुर्ची शाबूत ठेवता येऊ शकते याची ही शक्यता वर्तवली जात आहे.