प्रतिनिधी सोलापूर : रस्ता सुधारणा कामांची ई-निविदाद्वारे वर्क ऑर्डर मिळालेल्या तक्रारदाराकडे या कामाची सर्व जबाबदारी पार पाडून बिलाच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी सुपरवाझर या नात्याने ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करुन २० हजार रुपये स्वतः स्विकारल्याप्रकरणी शाखा अभियंता बबन हिरालाल गायकवाड (वय-५७ वर्षे) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जिल्हा परिषद बांधकाम विभाग करमाळा येथे शाखा अभियंता म्हणून पदभार असलेले बबन गायकवाड ( रा. फ्लॅट नं.३०६, ग्रीष्म अपार्टमेंट, करमाळा, जि. सोलापूर. मूळ रा. फ्लॅट नं.३०२, साई समर्थ अपार्टमेंट,
केशव नगर, मुंढवा, पुणे. वर्ग-२) यांनी तक्रारदार हे सुपरवाझर म्हणून काम करत असलेले कॉन्ट्रॅक्टर यांना जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक २ अंतर्गत १) वांगी नं. २ ते इझिमा १२ रस्ता सुधारणा करणे, २) वरकुटे ते साडे रस्ता सुधारणा करणे, ३) वीट चोपडे वस्ती ते झरे रस्ता सुधारणा करणे या कामांची ई-निविदाद्वारे वर्क ऑर्डर मिळालेली आहे. या कामाची सर्व जबाबदारी पार पाडून बिलाच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी सुपरवाझर या नात्याने यातील तक्रारदार यांच्यावर आहे.
त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता सदर कामापैकी वांगी नं.२ ते इझीमा १२ रस्ता सुधारणा कामाचे प्राथमिक बिल ५,८७,८६१ रूपये तक्रारदार यांना प्राप्त झाले असून, ते बिल काढण्याचा मोबदला तसेच उर्वरित ०२ कामाचे प्राथमिक बिल काढण्याकरीता म्हणून लोकसेवक बबन गायकवाड यांनी तक्रारदाराकडं ३०,००० रुपयांची लाचेची मागणी करुन, तडजोडअंती २०,००० रूपये लाच रक्कम गुरुवारी, २७ मार्च रोजी पंचासमक्ष मागणी करुन २० हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे, (ला. प्र. वि., पुणे) यांनी मार्गदर्शन अधिकारी तर पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार (ला.प्र.वि. सोलापूर) पर्यवेक्षण अधिकारी म्हणून तसेच सापळा पथकातील पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार पोहेकॉ.१५८ प्रमोद पकाले, पोकॉ.८६२ राजु पवार, पोकॉ.२२२२ रवि हटखिळे, चालक पोकॉ/शाम सुरवसे (सर्व नेमणुक : अॅन्टी करप्शन ब्यूरो, सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.