सोलापूर, 28 मार्च (हिं.स.)।
युवतीच्या अचानक मृत्यूनंतर न्यू पाच्छा पेठ परिसरात तणाव निर्माण झाला. गृहकर्जाची रक्कम भरूनही बँकेने घर लिलावात विकल्याच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी मृतदेह बँकेसमोर नेण्याची भूमिका घेतली होती. पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला.
भूमिका हरीश वाघमारे (वय १९, रा. न्यू पाच्छा पेठ, पाथरूट चौक, सोलापूर) असे मृत युवतीचे नाव आहे. ती वालचंद महाविद्यालयात एमबीएला होती. तिच्या कुटुंबीयांनी एका बँकेतून गृहकर्ज घेतले होते. ते थकल्याने बँकेने तीन महिन्यांपूर्वी घर सील केले होते. ती मामाकडे तर अन्य कुटुंबीय दुसऱ्या घरात राहत होते. अचानक तिचा मृत्यू झाला. बँकेने लिलावात घर विकल्याचे कळल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कर्जाची मोठी रक्कम भरली होती.