सोलापूर, 28 मार्च (हिं.स.)। माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संजय शिवलाल कोकाटे यांनी पक्षाची साथ सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे याच माढा तालुक्यात शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांचे प्रस्थ असून, त्यांच्याशी कोकाटे हे असे जुळवून घेतात, यावर त्यांचे पुढील राजकारण अवलंबून राहणार असल्याचे बोलले जाते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवून सत्ता मजबूत केली असताना इकडे सोलापूर जिल्ह्यात माढा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महायुतीला धोबीपछाड दिली होती. परंतु त्यानंतर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे सोलापुरातील या पक्षाच्या चारही आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत असताना कोकाटे यांनी पक्षातून बाहेर पडत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला आहे.