पुणे, 29 मार्च (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या घटनांची दखल घेत आता अखेर विद्यापीठाला जाग आली आहे. विद्यापीठाने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि अभ्यागत यांच्या सुरक्षेसाठी ‘विशेष सुरक्षा हेल्पलाइन’ सुरू केली आहे. हेल्पलाइनद्वारे विद्यापीठ परिसरातील सुरक्षेसंबंधित तक्रारी आणि आपत्कालीन परिस्थितीवर तत्काळ उपाययोजना केली जाणार आहे.
विद्यापीठामध्ये मुलांच्या वसतिगृहात अंमली पदार्थ, तर मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या सापडण्याचे प्रकार घडले आहेत. एवढंच नव्हे तर विद्यापीठाच्या आवारात मंगळवारी एका विकृत व्यक्तीने काही विद्यार्थिनींसमोर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर उशिरा का होईना जागे झालेल्या विद्यापीठाने सुरक्षेच्या दृष्टीने चोवीस तास सुरू असणारी हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. सुरक्षा संबंधित तक्रारी, आपत्कालीन परिस्थिती, कोणतीही घटना तत्काळ आणि विश्वासार्ह पद्धतीने नोंदविली जाणे, हा या हेल्पलाइन सुरू करण्यामागील उद्देश आहे.