पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील बाणेर इथे कोव्हिड सेंटरचं उद्घाटन झालं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एका मंचावर येत असल्याने, राजकीय वातावरणात आज कोण कशी फटकारे मारणार याविषयीची उत्सुकता होती.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस भाषण करताना माईकमधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘आवाज – आवाज’ येत नसल्याचे सांगितले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेऊन, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला असलेले अजित पवार यांना हसू आवरता आले नाही.
त्याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजनयुक्त 200 बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले, “राज्यात दररोज जवळपास 15 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. संसर्गाचा दर हा 15 टक्के आहे, हे चिंताजनक आहे. आजही आपला मृत्यूदर हा 3.2 टक्के आहे, जो देशापेक्षा जास्त आहे. टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यात टेस्टिंग समाधानकारक असलं तरी मुंबईत टेस्टिंग खूप कमी आहे”.