नवी दिल्ली , 17 एप्रिल (हिं.स.)।आयपीएल २०२५ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सुपरओव्हर सामन्यात दिल्लीने राजस्थानचा पराभव केला. सुपरओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने दिल्लीसमोर १२ धावांचे लक्ष ठेवले.दिल्लीचा फलंदाज केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी दोन चेंडू शिल्लक ठेऊन हा सामना जिंकला.
सुपर ओव्हरमध्ये राजस्थान संघ प्रथम फलंदाजी करायला आला. स्टार्ककडे गोलंदाजीची जबाबदारी होती. हेटमायर आणि रियान पराग फलंदाजीला आले. सुपर ओव्हरचा पहिला चेंडू डॉट होता. दुसऱ्या चेंडूवर हेटमायरने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर हेटमायरला एक धाव मिळाली. चौथ्या चेंडूवर रियान परागने चौकार मारला. हा नो बॉल होता. पराग फ्री हिटवर धावबाद झाला. पाचव्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना हेटमायर बाद झाला. अशाप्रकारे राजस्थान संघाला फक्त ११ धावा करता आल्या.
दिल्ली संघाकडून स्टब्स आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. तर, राजस्थानने संदीप शर्माच्या हातात चेंडू सोपवला. केएल राहुलने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलने शानदार चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर केएल राहुलने एक धाव घेतली. आता ३ चेंडूत ५ धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर शानदार षटकार मारून स्टब्सने सामना जिंकला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात करताच तिसऱ्या षटकातच जोफ्रा आर्चरने मॅकगर्कला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याच्या बॅटमधून फक्त ९ धावा आल्या. पुढच्याच षटकात करुण नायर धावचीत झाला. यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी भागीदारी केली. पण १३ व्या षटकात जोफ्रा आर्चरने केएल राहुलची ३८ धावांवर विकेट घेतली. यानंतर अभिषेक पोरेलही बाद झाला. दिल्लीच्या डावातील १७ व्या षटकात अक्षर पटेलही बाद झाला. यानंतर स्टब्स आणि आशुतोषने स्फोटक फलंदाजी केली. यामुळे दिल्लीला राजस्थानसमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवता आले.
१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाकडून संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी शानदार फलंदाजी केली. संजू सॅमसन वैयक्तिक ३१ धावांवर खेळत असताना त्याला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला. यानंतर रायन पराग फलंदाजीला आला. पण त्याला ९व्या षटकात अक्षर पटेलने आऊट केले. परागच्या बॅटमधून फक्त ८ धावा आल्या. यशस्वी जैस्वाल एक बाजू सांभाळून खेळत होता. त्याने अर्धशतकी खेळी केली, पण १४ व्या षटकात कुलदीप यादवने त्याला बाद केले. यानंतर नितीश राणानेही अर्धशतक झळकावले. शेवटच्या षटकात राजस्थानला जिंकण्यासाठी ९ धावांची आवश्यकता होती. पण स्टार्कने दमदार गोलंदाजी केली, ज्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.