सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकासाठी अक्कलकोट भाजपचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्वपक्षीय पॅनेल तयार केले. त्यांच्या सोबतीला सोलापूर शहर मध्यचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठेही आहेत. या पॅनेल विरोधात भाजपचेच आमदार सुभाष देशमुख यांनी शड्डू ठोकला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी बुधवारी (दि. 16) आपले राजकीय कट्टर शत्रू भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरी जात त्यांच्याशी बातचीत करत त्यांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले.
यामुळे आता भाजपच्याच चार आमदारांत बाजार समितीसाठी ‘काँटे की टक्कर’ होण्याची चिन्हे आहेत.सहकारातील मातब्बर नेते काँग्रेसचे माजी आ. दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, गणेश वानकर यांना सोबत घेत आ. कल्याणशेट्टी-आ. कोठेंनी श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेल तयार केले आहे.
याविरोधात आ. सुभाष देशमुख यांनी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनेल तयार करून आव्हान दिले आहे. त्यांना आ. विजयकुमार देशमुख, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आप्पासाहेब पाटील- वडकबाळकर यांनी पाठिंबा दिला आहे.
—————