अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.)
तालुक्यातील महसूल विभागाला जमीन महसूल, संकीर्ण महसूल व गौण खनिज कर वसुलीतून ५ कोटी ६० लाख ३७ हजार ६७८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती तहसील कार्यालयामधून प्राप्त झाली आहे.
जमीन महसूलीतून १ कोटी ५५ लाख ३ हजार ३१०, संकीर्ण वसुलीतून १ कोटी ५६ लाख १७ हजार ८६ रुपये तर गौण खनिजमधून शासनाला २ कोटी ४७लक्ष ८२ हजार ४८२ रुपयाचा महसूल प्राप्त झाला. अचलपूर तहसील कार्यालयाने खनिज संपत्तीतून मिळणारी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर झालेली वसुली तसेच करमणूक करामधून वसुली केली. करमणूक करापोटी अचलपूर तालुक्याला १ लाख ३४ हजार ८०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
गौण खनिज संपत्ती मधून मिळणारी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर झालेली गौण खनिजाची वसुली रक्कम तसेच करमणूक करावरील थकीत उपकर रक्कम असे मिळून अचलपूरला २ कोटी ४९ लाख १७ हजार २८२ रुपयाचा महसूल प्राप्त झाला. जमीन महसूल, वाढीव सारा, जिल्हा परिषद कर, ग्राम पंचायत उपकर, शिक्षण, पिके, रोजगार हमी योजना, अकृषक कर, नझुल कर, नगरपरिषद आदी विविध करातून शासनाला ३ कोटी ११ लाख २० हजार ३९६ रुपयाचा महसूल प्राप्त झाला. अनाधिकृत अकृषक, आस्थापना शुल्क, कुळ कायद्यानुसार सत्ता प्रकार करणे, नझुल भाडेपट्टा, नूतनीकरण रेकॉर्ड फी यामधूनसुद्धा महसूल प्राप्त झाला. अचलपूर महसूल विभागाला फटाका परवाना फी व इतर वसुली म्हणून ७ लाख ६५ हजार २३ रुपये प्राप्त झाले. असे सर्व करातून अचलपूर तालुक्यातील महसूल प्रशासनाला एकूण ५ कोटी ६० लाख ३७हजार ६७८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
कर वसुलीमध्ये उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांच्या मार्गदर्शनामध्ये तहसीलदार डॉ. संजय गरकल, निवासी नायब तहसीलदार जगदीश मंडपे, नायब तहसीलदार महसूल अक्षय मंडवे, सहाय्यक महसूल अधिकारी गजानन खडसे, मंडळ अधीकारी अमोल बोकडे, ग्राम महसूल अधिकारी निशांत शास्त्रकार तसेच सर्व मंडळ अधिकारी व सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी परिश्रम घेतले.