पुणे , 18 एप्रिल (हिं.स.)।माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या बीड सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याची अखेर पोलीस दलातून बडतर्फी झाली आहे.गंभीर आरोप आणि खोटे दावे केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.याबद्दल छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे माननीय पोलीस महानिरीक्षक यांनी कलम ३११(२)(ब) अंतर्गत रणजीत कासले यांना बडतर्फ केल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे.या कारवाई मुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रणजीत कासले याने सोशल मीडियावरून थेट धनंजय मुंडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत अनेक व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, रणजीत कासले याला आज बीड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज (दि. १८) पहाटे ताब्यात घेतले. कासले हा गुरुवारी दिल्लीवरून पुण्यात आला होता. तो रात्री एका हाॅटेलमध्ये मुक्कामी होता. आपण पोलिसांना शरण जाणार असल्याचे त्याने अधिच जाहीर केले होते. मात्र, आज पहाटेच पोलिसांनी त्याला हाॅटेलमधून अटक केली. एससी/एसटी कायद्याच्या कलम 3 (1) (आर) अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात ही अटक केली आहे.
रणजीत कासले याने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या एका व्हिडीओमध्ये असा दावा केला की, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या ‘बोगस एन्काउंटर’ची ऑफर मिळाली होती. यामुळे पोलीस यंत्रणेवर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित व्हिडीओंनी मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण केला.रणजीत कासले याचे आरोप केवळ वैयक्तिक पातळीवर नसून ते संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.तसेच कासले यांनी निवडणूक काळात आपली ड्युटी परळी विधानसभा मतदारसंघात होती. त्यावेळी आपल्याला ईव्हीएम मशीनपासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 10 लाख रुपये दिले, असाही आरोप केला.हा आरोप करताना त्याने बँक स्टेटमेंट देखील दाखवले.
ईव्हीएम मशीनशी छेडछाड होईल आणि मी गप्प बसावे म्हणून मला पैसे देण्यात आले. मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असल्याचेही कासले म्हणाला.आता त्यांच्या आरोपांची चौकशी होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर ते आरोप सत्य असल्याचे सिद्ध झाले, तर बडतर्फी ही एक बाजू ठरेल आणि पोलीस दलाला मोठा धक्का बसू शकतो. कासले याच्या व्हिडीओंना समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींनी त्यांच्या धाडसाची प्रशंसा केली, तर काहींनी त्यांना पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा म्हटले.दरम्यान, बीड पोलिस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी रणजित कासले याला निलंबित करण्यात आले होते.