मुंबई, 19 एप्रिल (हिं.स.)।नॅशनल टेस्टिंग एजन्सने(एनटीए) शनिवारी(दि.१९)जेईई मेन २०२५ सत्र २ चा निकाल जाहीर केला आहे. २ ते ९ एप्रिलदरम्यान एनटीएद्वारे ही परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेची अंतिम उत्तरसूची १८ एप्रिल रोजी जारी करण्यात आली होती. आता जेईई मेन २०२५ सत्र २ चा निकाल एनटीएने jeemain.nta.nic.in या अधिकृत पोर्टलवर जारी केला आहे. या परीक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत.यामध्ये देशातील २४ टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.
जेईई मेन २०२५ सत्र २ या परीक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत.यामध्ये देशातील २४ टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील आयुष रवी चौधरी, सानिध्य सराफ, विशाद जैन यांचा समावेश आहे. या वर्षी १०० पर्सेंटाईल गुण मिळवणाऱ्या २४ टॉपर्समध्ये दोन महिला उमेदवार आहेत. पश्चिम बंगालमधील देवदत्त माझी आणि आंध्र प्रदेशातील साई मनोगना गुठीकोंडा यांचा त्यात समावेश आहे. तर उर्वरित २२ पुरुष उमेदवार आहेत.
जेईई मेन २०२५ सत्र २ चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.त्यानंतर
‘JEE Mains result 2025 Session 2’ या लिंकवर क्लिक करावे आणि तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख नमूद करावी त्यानंतर तुमचे स्कोअरकार्ड पाहा आणि डाउनलोड करा.
जेईई मेन सत्र २ पेपर १ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी कटऑफ १०० ते ९३.१०२३२६२ आहे. जेईई मेन २०२५ सत्र २ पेपर १ परीक्षेत सुमारे ९७,३२१ उमेदवारांनी उत्तीर्ण पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. जेईई मेन सत्र २ पेपर १ परीक्षेसाठी एकूण १०,६१,८४० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,९२,३५० उमेदवारांनी परीक्षा दिली. जानेवारी २०२५ च्या सत्र १ परीक्षेत १३,११,५४४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १२,५८,१३६ उमेदवार परीक्षेला बसले होते.
आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर केंद्रीय अनुदानीत टॉप संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्याचे उद्दिष्ट असलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन २०२५ सत्र २ परीक्षा महत्त्वाची आहे. आता अंतिम उत्तरसूची उपलब्ध झाल्याने विद्यार्थी त्यांची उत्तरे पडताळून पाहू शकतात.