सोलापूर, 21 एप्रिल (हिं.स.) मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय सहकार विभागाचे सहनिबंधक राजकुमार पाटील यांनी रद्द केला आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाचा कारभार पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात आला आहे.
एकेकाळी वैभवाचे दिवस पाहिलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ अलीकडे काही वर्षांपासून रसातळाला गेला आहे. एकेकाळी दररोज साडेचार लाख लिटर दूध संकलन करणाऱ्या या दूध संघाचे दैनंदिन दूध संकलनही सध्या बंद झाले आहे. कोट्यवधींच्या आर्थिक तोट्यामुळे मृत्युपंथाला लागलेला जिल्हा दूध संघ पुन्हा ऊर्जितावस्थेत येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
या पार्श्वभूमीवर विद्यमान संचालक मंडळाची सहकार कायद्यानुसार चौकशी होऊन त्यात आर्थिक अनियमितता, गैरवस्थापन, दूध उत्पादक शेतकरीविरोधी कामकाज इत्यादी दोषारोप ठेवून संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. या कारवाईविरुद्ध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्यासह सर्व संचालकांनी अपील दाखल केले असता त्याला स्थगिती मिळाली होती.———————