खास प्रतिनिधी
सोलापूर : प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत. त्यांच्या मृत्यूप्रकरणी हॉस्पीटलमधील प्रशासन अधिकारी मनीषा मुसळे-माने हिच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येप्रकरणी ‘गृहकलहा’चा अत्यंत महत्वाचा मुद्दा पोलिसांनी नाकारलेला नाही, या मुद्याच्या आधारेदेखील सदर बझार पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.
विशेषत्वे,डॉ.वळसंगकरांच्या आत्महत्येच्यासंदर्भात गृहकलाच्या अनुषंगाने,काही महत्त्वाचे दुवे त्यांचे मित्र मंडळ, अत्यंत निकटवर्तीय तसेच राहत्या घराचे शेजारी यांच्याकडून पोलिसांना मिळत असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. संशयित मनीषा मुसळे-माने यांच्याकडूनदेखील काही महत्त्वाच्या बाबी पोलिसांना मिळत आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे डॉ. शिरीष वळसंगकर हे हॉस्पीटलमधील एखाद्या कर्मचार्याच्या धमकावण्यावरुन स्वत:ला संपवतील, इतक्या घाबरट स्वभावाचे ते नव्हते, त्यांच्या आत्महत्येला गृहकलासंबंधित काही वेगळी कारणे आहेत, याचा वस्तुनिष्ठ तपास व्हावा, अशी आग्रही विनंती त्यांचा मित्र परिवार तसेच शेजारी, हितचिंतक, नातेवाईक यांची पोलिसांना आहे.
दरम्यान डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी मृत्यूपत्र करुन ठेवलेले आहे, त्यामधून खूप काही माहिती पोलिसांना मिळणार आहे, त्यादृष्टीने डॉ. वळसंगकरांचे वकील कोण होते, कोणत्या वकीलाकडून त्यांनी हे मृत्यूपत्र करुन घेतले होते? ते कोणाकडे आहे, याच्या खोलात पोलीस चौकशीदरम्यान जात असून सोलापुरातील काही वकिलांकडे पोलिसांनी चौकशी केल्याची चर्चा येथील वकील मंडळींमध्ये आहे.
डॉ. अश्विन वळसंगकरांनी
हॉस्पीटलमधील स्टॉफची मिटींग घेतली पण…
डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर वळसंगकर परिवाराच्या हॉस्पीटलमधील कर्मचार्यांमध्ये सुसुत्रता नाही, पोलीसांच्या तपासाचा विनाकारण ससेमिरा आपल्या मागे लागू शकतो का, पोलीस तपासाला आपल्याला सामोरे जावे लागेल का? आपलेदेखील जबाब नोंदवले जातील का? या प्रश्नांच्या अनुषंगाने, हॉस्पीटलमधील सर्वच कर्मचारी भितीच्या सावटाखाली आहेत. दरम्यान डॉ. शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव डॉ. अश्विन वळसंगकरांनी सोमवार (ता.21) हॉस्पीटलमध्ये सर्व कर्मचार्यांची बैंठक घेतली. बैंठकीचे तपशील मिळू शकले नाहीत, शिवाय महत्त्वाचे म्हणजे डॉ. अश्विन यांनी पत्नी डॉ. सोनाली यांना हॉस्पीटलमध्ये अन्य ठिकाणी थांबवत वैयक्तिकरित्या स्वतंत्र बैंठक का घेतली? बैंठकीमधील माहिती बाहेर येऊ न देण्याबद्दल कर्मचार्यांना सज्जड दम का दिला, हे प्रश्न सोमवारी अनुत्तरीच राहिले.
घटनेच्या पंचनाम्यावेळी ‘ती’ चिठ्ठी कशी सापडली नाही?
शवविच्छेदन करण्यापूर्वी कपडे जप्त करताना ती कशी सापडली?
वास्तविक घटनेचा पंचनामा करतेवेळी संबंधित व्यक्तीची पूर्णपणे सुक्ष्म झडती घेतली जाते. संबंधित व्यक्तीच्या जवळच्या वस्तू, ऐवज असं जे पोलीस तपासाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे, ते सर्व ताब्यात घेतले जाते. मात्र डॉ. वळसंगकरांचे शवविच्छेदन करताना त्यांच्या अंगावरील कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यावेळी त्यांना पँटच्या खिशात चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर घटनेच्या पंचनाम्यावेळीच चिठ्ठी पोलिसांना मिळायला हवी होती, तसे झाले नाही हे उघड आहे. मग घटनेचा पंचनामा वस्तुनिष्ठपणे केला गेला नाही का? असा सवाल उपस्थित होत असून घटनेच्या पंचनाम्यावर प्रश्न चिन्ह आलं आहे.
सुसाईड नोटवर प्रश्नचिन्ह
पोलीस आयुक्त चक्क म्हणाले होते, सुसाईड नोट नाही
18 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डॉ. शिरीष वळंसगरकांनी स्वत: गोळ्या झाडून आत्महत्या केली. तद्नंतर 19 एप्रिल रोजी या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सदर बझार पोलिस ठाण्यात डॉ. अश्विन वळसंगकर यांनी फिर्याद दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी डॉ.वळसंगकरांच्या आत्महत्येसंबंधी सुसाईड नोट मिळालेली नाही, असे स्पष्टपणे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. मग त्यानंतर सुसाईड नोट म्हणजेच चिठ्ठी कोठे मिळाली, ही माहिती पोलीस आयुक्तांना सांगितली गेली नाही का? सांगितली गेली नसेल तर ती का सांगितली नाही, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
नवरा महेश मुसळे फरार;
पोलिसांकडून शोध सुरु
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर, मनीषा मुसळे-माने हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तद्नंतर मनीषा हिचा पती महेश माने याच्या शोधार्थ पोलीस आहेत, सध्या तो फरार आहे. त्याच्याकडून घटनेच्या अनुषंगाने, पोलिसांना काही महत्वाची घ्यायची आहे, त्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत.
मामुली नोकर मनीषा परस्पर पैशाचे व्यवहार करेलच कशी?
तिला तसे करण्यास भाग पाडणारा कोणतरी असेल बोलविता धनी
वास्तविक पाहता सर्वसामान्य कुंटुंबातील मनीषा मुसळे हिला मृत डॉ. शिरीष वळसंगकरांनी सर्वच आघाड्यांवर आयुष्यभरासाठी उभं केलं. मनीषा ही शिरीष सरांची अत्यंत विश्वासू सहकारी होती, म्हणून त्यांनी तिला हॉस्पीटलचं प्रशासन अधिकार असं अतिशय महत्वाचं पद दिलं. असं सगळं एकीकडं असताना दुसरीकडं मनीषा ही डॉ. शिरीष वळसंगकरांच्या विरुद्ध जाईलच कशी? हॉस्पीटलमधील कारभार त्यांना जसा अपेक्षित होता, तशीच ती करेल, हे सर्वश्रुत आणि सर्वमान्यदेखील आहे. कागदावर न नोंदविता पैशाचे व्यवहार मामुली नोकर असलेली मनिषा ही डॉ. शिरीष सरांच्या विरुध्द जाऊन कशी करेल? त्यांच्या विश्वास ती कशाला गमावेल? हॉस्पीटलशी संबंधित असणारे अन्य विश्वस्त तिला तसा कारभार करण्यास भाग पाडत असतील, पैशांचे व्यवहार न नोंदविता हॉस्पीटलमधून पैशांना बाहेर येण्यास पर्यायाने पाय फुटायला भाग पाडणारा विश्वस्तांपैकी कोणतरी बोलविता धनी हमखास असणार हे उघड आहे, मनीषा मुसळे-माने हिच्या जबाबातून ही माहिती समोर येऊ शकते.
मनिषाच्या धमकीचे मिटले होते प्रकरण,
तरीपण डॉ.वळसंगकरांनी तिच्याबद्दल चिठ्ठी लिहिलीच कशी?
खरं तर हॉस्पीटलमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनिषा मुसळ-माने हिला कामावरुन काढले जाणार अशी कुणकुण लागल्यानंतर मनिषा हिने डॉ. वळसंगकरांना धमकी दिली होती. मी जाळून घेऊन आत्महत्या करेन, असं तिनं धमकीतून सांगितलं होतं. यावर डॉ.शिरीष वळसंगकर आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी मनिषा हिला बोलावून घेतलं होतं. यादरम्यान झालेल्या चुकीबद्दल माफी मागून तिने माफीनामासुद्धा डॉक्टरांना लिहून दिला होता, डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पत्नीने मध्यस्ती करुन या प्रकरणावर पडदा पाडला होता. तिथं हे प्रकरण संपलं होतं. मग असं असताना डॉ.वळसंगकरांनी तिच्याबद्दल चिठ्ठी कशी काय लिहिली, असा महत्वाचा मुद्दा डॉ. वळसंगकरांचे अत्यंत निकटवर्तीय, तसेच खास मित्र परिवार यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
…तरीही वळसंगकर कुंटुंबातील सदस्यांना मनिषाबद्दल सहानभूती का?
कामावरुन काढण्यावरुन तिच्याबद्दल त्यांच्या घरात का होता वाद?
आर्थिक व्यवहारासंबंधी कागदोपत्री किंवा संगणावर नोंदी कोठेच न करता हॉस्पीटलकडे जमा होणार्या लाखातल्या रक्कमा मनिषा मुसळे-माने ही घेत होती. डॉ. वळसंगकरांना हे मान्य नव्हते. कोट्यवधीच्या रकमा नोंदी न करता हॉस्पीटल बाहेर गेल्या, त्यावरुन डॉ. शिरीष वळसंगकरांनी तिला कामावरुन काढलं. या टप्यावर वळसंगकर परिवारातील सदस्यांमध्ये वाद व्हायचे? मनिषा जुनी तसेच विश्वासू कर्मचारी आहे, साधारण 25-30 वर्षे आपल्याकडे काम करतेय, तिला कामावर घ्यायलाच हवे, असा सूर डॉ. शिरीष वळसंगकरांकडे कुंटुंबातील काही सदस्यांकडून आळवला जायचा, खरं तर हॉस्पीटकडे जमा होणार्या खूप मोठ्या रकमांची नोंद न करता मनिषा सारख्या नोकराला परस्पर पैसे हॉस्पीटलचे मालक, चालक हे कसे उचलू देतील, शिवाय मोठ्या रकमांचा परस्पर गफला करणार्या मनीषा हिला कामावर पुन्हा घ्या, असा आग्रह वळसंगकर कुंटुंबातील सदस्याचा का होता? यामध्येच खूप काही दडलेलं स्पष्ट होतं.
चौकट
कोट स्वरुपात
संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने हिची पोलीस कोठडी संपायला अजून दोन दिवस बाकी आहेत, त्या धर्तीवर तिच्याकडून सुक्ष्म माहिती घेतली जात आहे. दोन दिवसात खूप काही माहिती आमच्याकडे येईल. तपास योग्य दिशेने तसेच वस्तुनिष्ठ होण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलीस उपायुक्त (परिमंडल) विजय कबाडे यांच्या सुचना दररोज मिळत आहेत, त्यानुसार, तपास सुरु आहे. या घटनेच्या तपासावर पोलीस आयुक्त आणि उपायुक्त या दोघांचेही खास लक्ष आहे. मनिषा मुसळे-माने हिच्याशिवाय अन्य काही संबंधितांकडून आम्ही माहिती घेत आहोत.
– अजित लकडे, पोलीस निरीक्षक, सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर
—