भोपाळ , 22 एप्रिल (हिं.स.)।मध्यप्रदेशातील दमोह जिल्यातील बनवार रस्त्यावरील सिमरी गावाजवळ आज(दि.२२) एक बोलेरो नदीच्या कोरड्या असणार्या पात्रात कोसळून भीषण अपघात घडला आहे.यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दमोह जिल्ह्यातील नोहटा पोलिस ठाण्याअंतर्गत बनवार रस्त्यावर सिमरीजवळ महादेव घाट पुलावरुन बोलेरो नदीच्या कोरड्या असणार्या पात्रात कोसळली. ही घटना आज(दि.२२) सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जणांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पोलिसांनी जबलपूर रुग्णालयात दाखल केले आहे. बोलेरोमधून १५ जण प्रवास करत असल्याची माहिती समजतं आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दुर्घटनाग्रस्त जबलपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती स्थानिक पाेलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक श्रुत कीर्ती सोमवंशी यांनी सांगितले की, मंगळवारी (दि.२२) सकाळी जबलपूर जिल्ह्यातील कटंगी पाऊडी गावाजवळील रहिवासी दोन बोलेरो गाड्यांमधून दमोह जिल्ह्याच्या हिंडोरिया पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या घाटपिपरिया गावातून कॅन्सरची औषधं घेऊन परत येत होते. दरम्यान, सिमरीजवळ सुनार नदीच्या पुलावर एका बोलेरोचा ताबा सुटल्याने ती नदीत कोसळली.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री स्वयंसेवा अनुदानातून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.