सोलापूर : ख्यातनाम मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येच्या घटनेच्या निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी सदर बझार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे ‘मिशन ऑपरेशन डॉ. वळसंगकर’ सुरु आहे. या अंतर्गत मुख्य तपास अधिकारी सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सोलापुरातील मोदी परिसरातल्या डॉ. वळसंगकर हॉस्पीटलमध्ये दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास पोचले, सांयकाळी सव्वा सात वाजता लेखनिक आवारे यांना घेऊन हॉस्पीटल बाहेर फाईल्स् अन् कागदांचा मोठा गठ्ठा घेऊन बाहेर पडले. साधारण तब्बल सात तास पोलीस निरीक्षक लकडे यांनी येथे ठिय्या मांडत हॉस्पीटलमधील संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांची जणू काही झाडाझडती घेतली. संबंधितांकडे घटनेच्या पार्श्वभूमीवर, माहिती विचारुन त्यांचे जाबजबाब नोंदविले.
विशेष म्हणजे डॉ.वळसंगकरांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर, चौकशीसाठी सदर बझार पोलीस ठाण्याचे पथक दुपारी डेरेदाखल झाल्यापासून हॉस्पीटलमधील वित्त व लेखा विभाग स्ट्रेस आला होता. पोलिसांच्या खोचक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार, याची चर्चा कर्मचार्यांमध्ये सुरु झाली.साधारण मंगळवार दुपारी दीड वाजलेपासून तपास अधिकारी लकडे यांनी चौकशीला सुरुवात केली. अधिपरिचारिका अधीक्षक कक्ष, वैद्यकीय अधीक्षक कक्ष आदी ठिकाणी त्यांनी आपल्या ठिय्या मांडला. तपास अधिकारी लकडे यांनी चौकशीदरम्यान यावेळी कर्मचार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. खोचक आणि उलट-सुलट प्रश्नांना उत्तरे देताना पोलीस चौकशीला यापूर्वी कधीही सामोरे न गेलेल्या कर्मचार्यांच्या अंगाला अक्षरश: कापरं भरलं. सगळी चौकशी होईपर्यंत संबंधित कर्मचार्यांचे हात-पाय थरथरत होते. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना कित्येकजणांची बोबडी वळली. अंगाला घाम फुटल, घशाला कोरड पडल्याची वस्तुस्थिती हॉस्पीटलमध्ये बघायला मिळाली.
दीड लाखाच्या पगारदार मनीषाची दादागिरी अन् दडपशाही
वाळलं अन् ओलं कसंही जाळून इतर कर्मचार्यांच्या पगाराला लावायची टाच!
: मुसळे-मानेच्या अटकेचे हॉस्पीटल कर्मचार्यांमधून समर्थनच
: हॉस्पीटलची पिडा अन् कीड गेल्याच्या कामगारांच्या प्रतिक्रिया
सोलापूर : सुरुवातीला डॉ. शिरीष वळसंगकर आणि पुढे डॉ. अश्विन आणि त्यांच्या पत्नी डॉ. शोनल वळसंगकर यांच्या गळ्यामधील ताईत झालेल्या वळसंगकर हॉस्पीटलच्या प्रशासन अधिकारी मनीषा मुसळे-माने यांची येथे मोठी दशहत तर होतीच होती. पण त्यांच्याकडून इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हुकमत होती. तिच्याकडून दादागिरी आणि दडपशाही व्हायची, अशा प्रतिक्रिया हॉस्पीटलमधील अनेक कर्मचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक सुराज्यकडे बोलून दाखविल्या.
विशेष म्हणजे स्वत:ला तब्बल दीड लाख पगार असलेल्या मनिषा ही इतर कर्मचार्यांच्या नरडीला नख लावायची. कोणत्या कोणत्या कारणावरुन कर्मचार्यांचा आख्खा पगार कापायची, त्याबद्दल कर्मचार्यांमध्ये प्रचंड रोष आहे. हा रोष संबंधितांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
दरम्यान डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येप्रकरणी तिच्यावर झालेल्या अटकेचे येथील साधारण 80 टक्के कर्मचार्यांनी समर्थन केले. मनीषा मुसळे -माने ही हॉस्पीटलमधून गेली म्हणजे इथली पिडा गेली, इतकेच नव्हे, हॉस्पीटलला लागलेली कीड गेली असे आम्ही म्हणू अशा प्रतिक्रिया कर्मचार्यांनी व्यक्त केल्या.
हॉस्पीटलच्या तिसर्या मजल्यावर चिरंजीव अन् सून वास्तव्यास
डॉ. शिरीष सर मोदीत, तरीपण कौंटुंबिक कलाहाचा जांगडगुत्ता
मृत डॉ.शिरीष वळसंगकर हे आपल्या पत्नीसह मोदी परिसरातील सोनामाता हायस्कूलच्या परिरात राहायला होते. तर त्यांचे चिरंजीव डॉ. अश्विन आणि डॉ. शोनाली हे रामवाडी परिसरातील डॉ.वळसंगकर हॉस्पीटल इमारतीच्या तिसर्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. मृत डॉ. शिरीष यांच्याकडे मुलगा आणि सून यांच्या वारंवार जाणे-येणे असायचे. कौंटुंबिक कलहाचा जागंडगुत्ता तिथेच वारंवार व्हायचा, असे शेजारी, मित्र परिवार आणि या परिसरातील एका नामांकित कापड दुकानामधील कामगारांनी सांगितले.