मुंबई, 23 एप्रिल (हिं.स.)। नवी मुंबईतील घरांचे प्रश्न, सिडकोची घरे, फ्रीहोल्ड जमीनींचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून कंडोनियमचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास खात्यातून विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेनेकडून वाशी येथे आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नवी मुंबईतील १३ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर खासदार नरेश म्हस्के, आमदार शरद सोनावणे, उपनेते विजय चौगुले, विजय नाहटा, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, मनोज शिंदे यासह नेते पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नवी मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक ५३ झाले आहेत. शिवसेनेत प्रवेश होत नाही असा एकही दिवस जात नाही. खऱ्या शिवसेनेवर लोकांचे प्रेम आणि विश्वास आहे. सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या भाषेचे लोक, इतर राज्यांतील लोक शिवसेनेत येत आहेत. या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. अडीच वर्षात वर्षा बंगला लोकांसाठी खुला केला. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
मुंबईत उबाठाचे ४५ आणि काँग्रेस व इतर पक्षांचे मिळून ६० ते ६५ नगरसेवक शिवसेनेत आले आहेत. जसा राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा त्यांचा जीव मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मी रस्ते धुतले पण तुम्ही मुंबईची तिजोरी लुटली अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. नवी मुंबईतील नागरी समस्या सोडवण्यासाठी नगरविकास विभागाकडून विशेष निधी देऊन काम करु, असे ते म्हणाले.
आजच्या मेळाव्यात नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर काँग्रेस नेते अविनाश लाड, माजी नगरसेविका प्रणाली अविनाश लाड, दापोली नगरपरिषदेचे नगरसेवक अविनाश मोहिते, नवी मुंबईत उबाठा गटाचे शहर संघटक सोमनाथ वास्कर व माजी नगरसेविका पत्नी कोमल वास्कर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड, माजी नगरसेविका दिव्या गायकवाड, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे, उबाठा गटाचे माजी नगरसेवक रंगनाथ औटी आणि उबाठा गटाच्या उपशहर संघटक शशिकला रंगनाथ औटी, उबाठाचे शहर प्रमुख काशिनाथ पवार, उबाठाच्या उपजिल्हासंघटक व माजी नगरसेविका भारती कोळी, उबाठाच्या माजी नगरसेविका मेघाली राऊत, माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी, माजी नगरसेविका आरती शिंदे, उबाठाचे पदाधिकारी सदाशिव मनगुटकर, माणिक पाटील, चंद्रकांत शेवाळे, हितेश पाटील, शाखा प्रमुख रविंद्र कदम, मंदार सावंत व अलका राजे, अंकुश वैती, तुकाराम काळे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गगनदीप सिंग कोहली यांची नवी मुंबई शीख समाज जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, नवी मुंबई ही सोन्यासारखी आहे परंतु मागील ११ महिन्यांपासून येथे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. इथल्या भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतला असून यासंदर्भात तातडीची बैठक लावली आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची संख्या ५० वर गेली, आणखी बरचसे नगरसेवक शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत, असे नवी मुंबई बेलापूर विधानसभेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर म्हणाले. नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवावा, असे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न एकनाथ शिंदे पूर्ण करताना दिसत आहे, असे पाटकर म्हणाले. युती झाली तर ठिक नाहीतर शिवसेना एकटी लढेल आणि पालिका जिंकू, असा विश्वास पाटकर यांनी व्यक्त केला.