मुंबई, 23 एप्रिल (हिं.स.) : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि.२२) पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांनी आपला जीव गमवला आहे. या हल्ल्यानंतर सर्व स्तरावरून प्रतिक्रिया येत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडिया पोस्टद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “सरकारनं या हल्ल्याच्या सूत्रधारांना धडा शिकवावा आणि यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना केंद्र सरकारच्या मागे उभी असेल,” असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणलं आहे की, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
पुढे ते म्हणाले की, या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली… एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे…
केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी. हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल. असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणलं आहे.