विष्णू सुरवसे
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आता अंतिम टप्यात आली आहे. सगळ्या मतदारांपर्यंत पोचताना दमछाक होत आहे. दरम्यान निवडणुकीमधील पॅनल प्रमुख तसेच उमेदवार यांच्या कुंटुबातील सदस्यदेखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरुन विजयाचा गुलाल आपल्याच अंगावर घेण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. माजी आमदार दिलीप माने यांच्यासाठी सुपुत्र पृथ्वीराज माने, आमदार सुभाष देशमुख हे चिरंजीव मनीष देशमुखांसाठी, अनिता विभुते यांच्या विजयासाठी पती माजी संचालक केदारलिंग विभुते,माजी संचालक वसंतराव पाटील हे आपले चिरंजीव प्रथमेश यांच्यासाठी तर माजी व्हाईस चेअरमन श्रीशैल नरोळे यांच्या पदरात विजय पडावा म्हणून बंधू नटराज नरोळे हे प्रयत्नांची पराकष्टा करीत आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे.
दिवस उजेडल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत फक्त बैठक मध्ये प्रचाराचा विषय, शिवाय ‘आपण-आणि ते’ अशा विषयावर बैठकाचा सपाटा सुरु आहे. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा धुराळा वाढत्या उन्हात उडत आहे. बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून माजी आमदार दिलीप माने यांचे सुपुत्र पृथ्वीराज माने स्वतः तर यामध्ये युवा मंच कार्यकर्तेदेखील जोर लावत आहेत. दक्षिणमध्ये सुरेश हसापुरे यांचे नातलग,कार्यकर्ते मित्र मंडळी हिरहिरीने सहभाग नोंदवत आहेत.
दक्षिण सोलापूर मधील सोसायट्या व ग्रामपंचायतींवर सुरेश हसापुरे यांचे चांगले वर्चस्व आहे.आमदार सुभाष देशमुख यांच्या शेतकरी परिवर्तन पॅनेलकडून पुत्र मनीष देशमुख यांच्यासाठी शिवाय पॅनलमधील उमेदवारासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. बळीराम साठे,विजयकुमार देशमुख,मनीष काळजे यांनी देखील आपली कमान सांभाळत प्रचारात आघाडी घेतली असून रामप्पा चिवडशेटी शिवाय मित्र, पै-पाहुणे अशा ओळखी काढत मतदारांची जोडणी दोन्ही बाजूने सुरू आहे.
आमदार सुभाष देशमुख मनिष यांच्या पदरात जास्तीजास्त मतदान पाडण्यासाठी जिवाचे रान करत आहेत. ऊन, वारा याची तमा न बाळगता,ना भूक ना ताण याची जाणीव न होता फक्त भेट आणि उमेदवारास मतदान करा, एकदा संधी मिळावी, अशी विनंती केली जात आहे. कट्टर राजकीय विरोधाला फाटा देत अनेकांची दारेही त्यांनी ठोठावली आहेत. दोन्ही पॅनल मध्ये तुल्यबळ व वजनदार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
प्रचाराची मॅरेथॉन,
विजयासाठी वाटेल ते…
मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. पहिल्या टप्प्यात बैठकीचे सत्र झाले. आता मात्र प्रचाराला गती आली आहे. उमेदवार तिन्ही तालुक्यातील घरे दारे,नाती- गोती,पक्षातील कार्यकर्ता,नेते पिंजून काढत आहेत, मतदारांच्या गाठीभेटी वर घेत प्रचार सुरू आहे.. थेट पॅनेल टू पॅनेलच मतदानाचा आग्रह मतदारांकडे धरला जात आहे. तीन तालुक्यात दोन पॅनलकडून प्रचाराची मॅरेथॉन सुरु आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करुन विजयाचा गुलाल अंगावर घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
कल्याणशेट्टी, माने, हसापुरेंच्या पॅनलची आघाडी
आ. सचिन कल्याणशेट्टींसह माजी आमदार माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे व शिवानंद पाटील-कुडलकर, रामचंद्र होनराव यांचा वेगाने प्रचार सुरू आहे. प्रचारात आणि मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात या कल्याणशेट्टी, माने आणि हसापुरे यांच्या पॅनलने आघाडी घेतली आहे.