सोलापूर, 24 एप्रिल (हिं.स.)।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी सोलापूरच्या विमानतळाचे ऑनलाइन उद्घाटन पार पडले. आता सात महिने संपत आहेत, तरीदेखील नियमित विमानसेवा सुरू झालेली नाही. सोलापूरहून मुंबई, गोव्याला जाणाऱ्या विमानांसाठी तेथील विमानतळांवर स्लॉट देखील उपलब्ध झाले आहेत, पण आता विमान कंपन्या सेवा सुरू करण्यासाठी पुढे येण्याची प्रतीक्षा आहे. सोलापूर विमानतळाचा सध्याचा रन-वे पाहता ४२ सीटर विमानसेवा येथून सुरू होऊ शकते, असे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर विमानतळाचा समावेश २०१६ मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘उडान’ (उडे देश के नागरिक) योजनेतही आहे. राज्य सरकारने देखील कंपन्यांना प्रवाशांअभावी काही भुर्दंड बसला तर तो सहन करण्याची तयारी दर्शविली आहे. पूर्वी, गोवा-सोलापूर- मुंबई असा मार्ग निश्चित झाला होता, पण तो पुन्हा बदलला. आता सोलापूर- गोवा, सोलापूर- मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.