पुणे, २८ एप्रिल (हिं.स.) : पुणे विभाग, मध्य रेल्वेने प्रवाशांची व रेल्वे मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या काळात नव्याने निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट केल्या आहेत. विशेषतः पुणे स्थानकास संवेदनशील स्थानक म्हणून घोषित करण्यात आले असून खालील उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या उपाययोजना
पुणे स्थानकावर संध्याकाळी अतिरिक्त निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित आकस्मिक तपासणी केली जात आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नियमितपणे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
जीआरपी अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठकांचे आयोजन केले जात आहे.
श्वान पथकांच्या मदतीने तपासणी करण्यात येत आहे.
सर्व शिफ्ट इनचार्ज व ड्युटी ऑफिसर्स आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्क्युलेटिंग क्षेत्रात शस्त्रासह ड्युटी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्थानक परिसरात अतिरिक्त तपासणी व गस्त वाढविण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना अगदी कमी कालावधीत सूचना मिळताच तातडीने आवश्यक जागी जमा होण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ताडीवाला रोड, पुणे येथे प्रत्येकी 30 खाटांच्या दोन बरॅक्स तयार करण्यात आल्या आहेत.
जवळ राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी DSCR पुणे येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्वरित माहिती प्रसारित करण्यासाठी एक आपत्कालीन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
प्रत्येक पाळीत एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचा सशस्त्र पथक गस्त घालत आहे.
पुणे विभागातील सुमारे 24 महत्वाच्या गाड्यांमध्ये एस्कॉर्टिंग व्यवस्था आहे.
निरीक्षक आपल्या कार्यक्षेत्रातील गाड्यांमध्ये गस्त घालत आहेत व स्थितीची देखरेख करत आहेत.
रात्रीच्या वेळी एक निरीक्षक ड्यूटी स्टेशन कंट्रोल रूमशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे.
साध्या वेशातील विशेष पथके स्थानके व गाड्यांमध्ये माहिती संकलनासाठी तैनात आहेत.
‘रेल मदत’ या मंचावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नियमितपणे देखरेख केली जात आहे.
गुप्तचर माहिती संकलनासाठी SIB युनिटसोबत समन्वय साधला जात आहे.
पुणे विभाग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सदैव वचनबद्ध असून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे.