लखनऊ, 15 मे (हिं.स.) : बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या एका स्लीपर बसला आज, गुरुवारी सकाळी लखनऊ येथे आग लागली. या घटनेत बसमधील 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवत प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार, बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे 80 प्रवासी होते. मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. पहाटे 5 वाजेच्या सुमाराला बसमधील सर्वजण झोपेत असताना अचानक आग लागली. आग लागल्यानंतर बस काही काळ जळत्या स्थितीत धावत राहिली. ड्रायव्हर आणि कंडक्टरने काच फोडली आणि पळून गेले. आगीमुळे मुख्य दरवाजा अडकल्याने उघडत नव्हता. त्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आले नाही. काहींनी काचा फोडून उड्या मारल्या. स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिस आगीच्या कारणांचा शोध घेत आहेत.
———————–