अमरावती, 15 मे (हिं.स.)ऐन बोहल्यावर चढण्याच्या आदल्या दिवशी घरातून गायब झालेल्या काँग्रेस नेत्याच्या पुत्राचा अद्याप शोध लागला नाही.दरम्यान बुधवारी १४ मे रोजी दुसऱ्या दिवशी त्याचे लोकेशन नागपुरात मिळाले आहे. त्यामुळे फ्रेजरपुऱ्याचे पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वातील चार सदस्यीय चमू त्या दिशेला रवाना झाली असून, त्याचा शोध घेतला जात आहे.येथील काँग्रेसनगरचे रहिवासी, सहकार क्षेत्रात प्राबल्य राखणारे नेते यांच्या मुलाचा विवाह बुधवारी ठरला होता. त्यादृष्टीने वर-वधू अशा दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
परंतु मंगळवारी १३ मे रोजी सकाळी नियोजित वर गायब झाला. बराच वेळ झाल्यानंतरही तो न परतल्यामुळे काळजीत पडलेल्या वडिलांनी दुपारनंतर फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. काही आवश्यक साहित्य आणायचे आहे, असे सांगून हा नियोजित वर घराबाहेर पडला होता, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरू केले.दरम्यान सायंकाळी त्या नियोजित वराची दुचाकी बडनेरा रेल्वे स्टेशनवर दिसली. त्यामुळे त्याने रेल्वेने मुंबई किंवा नागपुरच्या दिशेने कूच केले असावे,
असा अंदाज पो पोलिसांमार्फत बांधला गेला. शोध मोहीम सुरू असतानाच पोलिसांना त्याचे लोकेशन नागपुरात आढळल्याने पोलिसांनी चार सदस्यीय चमू गठित करून शोध सुरू केला.पोलिसांच्या माहितीनुसार त्याने फोन बंद ठेवला आहे. त्यामुळे तपासात अडथळा येत असून, फोन सुरू झाल्यावरच त्याचे नेमके लोकेशन गाठता येईल. दरम्यान वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करुन पोलिस कसोशीने त्याचा शोध घेत आहे.
